लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदरच्या राजकारणात राष्ट्रवादीचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांचे महत्व अनन्यसाधारण असल्याने त्यांच्या कारागृहातील सुटकेनंतर आयारामांच्या भाऊगर्दीत वावरत असलेले भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी सावध पवित्रा घेतला आहे. पक्षातील गळती रोखण्यावर त्यांनी लगोलग लक्ष दिले आहे. इच्छुकांच्या जनसंपर्कालाही ब्रेक लावला आहे. शिवाय पक्षाच्या सूचनेनुसार आगामी पालिका निवडणुकीतील विजयासाठी प्रचार प्रशिक्षणालाही सुरूवात केली आहे. मेेंडोन्सा हे एका जमीन गैरव्यवहारप्रकरणी आठ महिन्यांपासून कारागृहात होते. मेंडोन्सा यांचे राजकीय वैरी ठरलेले आमदार मेहता यांनी सर्वप्रथम राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीचे काही नगरसेवक शिवसेनेतही स्थिरावले. मेंडोन्सा यांची जामिनावर सुटका झाल्याने विविध पक्षातील दिग्गजांनी त्यांची व्यक्तीश: भेट घेत विचारपूस केली. याला मेहता अपवाद ठरले. मेंडोन्सा यांच्या सुटकेमुळे मेहता यांनी सावध पवित्रा घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मेंडोन्सा हे राजकीय समीकरण बदलण्यास सक्षम असून मागील काळात त्यांनी युतीच्या तोंडातील घास अनेकदा हिरावून घेत आपल्या राजकीय वर्चस्वाचा प्रत्यय आणून दिला. २५ वर्षापासून सत्तेची चव चाखणारे मेंडोन्सा आठ महिन्यांच्या शिक्षेनंतर बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवसेना प्रवेशाचा निर्णय न घेता वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. त्यांच्या हालचालींकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा खिळल्या असल्या, तरी भाजपाने मात्र सावध राहणेच पसंत केले आहे. त्यातच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. ती शक्यता त्यांच्या सुटकेनंतर बळावली असली, तरी त्यांचा शिवसेनेतील प्रवेश मात्र लांबला आहे. प्रवेशासाठी योग्य मुहूर्ताची चाचपणी करण्यात येत असून पुढील महिन्यात त्याचा मुहूर्त निश्चित होण्याची शक्यता आहे. मेंडोन्सा यांच्या प्रत्येक डावपेचावर लक्ष ठेऊन असलेले मेहता यांची पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आऊटगोर्इंवरही बारीक नजर आहे. इच्छुकांची संख्या उदंड झाल्याने उमेदवारी कुणाला द्यायची, असा पेच मेहता यांच्यापुढे उभा ठाकला आहे.
मेंडोन्सांच्या एन्ट्रीने भाजपात धडकी
By admin | Published: May 24, 2017 1:15 AM