ठाणे : ठाण्यातील म्यूस या संस्थेद्वारे ‘अ पिरेड आॅफ शेअरिंग’ या उपक्रमातून भारतामध्ये प्रथमच महिलांच्या मासिकपाळीबद्दल असलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर होण्यासाठी मासिका महोत्सव सुरू झाला आहे. या कालावधीत भारतातील विविध राज्यांमध्ये निरनिराळे उपक्रम होणार आहे. जागतिक मासिकपाळी दिनानिमित्त रविवारी महोत्सवाचा समारोप सायंकाळी साडेपाच वाजता उपवन येथील अॅम्फी थिएटरमध्ये होईल. विशेष म्हणजे यात वंचित महिला ‘आता माझी पाळी’ या विषयावर पथनाट्य सादर करणार आहे. मुस्कुराहट फाऊंडेशन, द मुंबई आर्ट कलेक्टिव्ह, वर्डस टेल स्टोरीझ, थिंक आऊट आॅफ पॅड, ओ वुमानिया, एसबीआय यूथ फॉर इंडिया या भारतातील वेगवेगळ्या तरूण पिढीच्या संस्थांनी एकत्र येऊन हा महोत्सव भरवला आहे. २१ मे पासून सुरू झालेला महोत्सव २८ मे पर्यंत सुरू राहणार आहे. यानिमित्ताने रविवारी सायकल रॅली काढली होती. २५ सायकलस्वार यात सहभागी झाले होते. समारोपाच्या दिवशी गायन, नृत्य होणार असून मासिकपाळी आणि त्याबद्दलच्या अंधश्रद्धा यावर चर्चासत्र होणार आहे. मासिक पाळीबाबत अंधश्रद्धा दूर करणे हा महोत्सवाचा उद्देश आहे. महोत्सवाच्यानिमित्ताने मासिक पाळी हा घाबरत उच्चारला जाणारा शब्द गाणी, नृत्य आणि खेळातून पोहचवला जाणार आहे. कापडी पॅड बनवण्याची कार्यशाळा, ऋतूकपचा उपयोग, लघुचित्रपट स्पर्धा, मुक्त काव्यवाचन, सायकल रॅली, ब्याकेथोन, खडू चित्र स्पर्धा, पथकला स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा आणि सांस्कृतिक संध्याकाळ असे विविध कार्यक्रम होणार असेल्याचे आयोजक निशांत बंगेरा म्हणाले. पाळीमुळे असणारी लाज आणि अंधश्रद्धा याचा परिणाम महिलांवरच नाही तर समाजावरही होतो.
मासिकपाळीचे गैरसमज होणार दूर
By admin | Published: May 24, 2017 1:07 AM