कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आपला विरोध आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे सभांमधून सांगत असले, तरी त्यांची ही भूमिका काही पदाधिकाऱ्यांना पटली नसल्याचे सांगत कल्याण-डोंबिवलीचे माजी उपमहापौर शरद गंभीरराव यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. राज यांची भूमिका अप्रत्यक्षपणे काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ देण्यास सुचवत असून हे अनेकांच्या मनाला पटणारे नाही, असे गंभीरराव म्हणाले.गंभीरराव हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. त्यांनी महापालिकेच्या २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी शिवसेना सोडून मनसेत प्रवेश केला होता. गेली नऊ वर्षे ते मनसेत होते. उपजिल्हाध्यक्षपदी असलेल्या गंभीरराव यांनी २०१५ मध्ये महापालिकेची निवडणूकही लढवली होती. परंतु, त्यांचा पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेत झालेल्या शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभेत राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका न पटल्याने मनसेला सोडचिठ्ठी दिल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज यांच्या भूमिकेवरून स्थानिक पातळीवर मनसेत दोन गट पडल्याचे गंभीरराव यांच्या पक्षत्यागामुळे निदर्शनास आले.दरम्यान, महापालिका निवडणुकीत मनसेतील काही मंडळींनी विरोधात काम केल्याने पराभव पत्करावा लागल्याने गंभीरराव नाराज होते. या पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांनी मनसेचे काम करणेही थांबवले होते.मी मूळचा शिवसैनिक होतो. नंतर, मनसैनिक होतो. मी हिंदुत्ववादी आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची विचारसरणी वेगळी आहे. त्यांचे विचार न पटणारे आहेत. राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका अनेक मनसैनिकांना पटलेली नाही. पूर्वाश्रमीचा शिवसैनिक असल्याने मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला. मनसेतील अंतर्गत राजकारणालाही कंटाळलो होतो.- शरद गंभीरराव, माजी उपमहापौर‘मोदीमुक्त भारत’ हाच मनसेचा अजेंडा आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेनुसार सर्वच मनसैनिक मोदींविरोधात प्रचार करीत आहेत. कोणीही नाराज अथवा गट पडलेले नाहीत. गंभीरराव यांची भूमिका नेहमीच बदलती राहिली आहे. ज्या पक्षात हित वाटते त्याप्रमाणे ते पक्ष बदलतात.- प्रकाश भोईर, मनसे जिल्हाध्यक्ष, विरोधीपक्षनेते केडीएमसी
कल्याणमध्ये मनसेतील अस्वस्थता चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 1:36 AM