- राजू काळे
भार्इंदर - जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतात दर पाच महिलांमागे एक महिला तर दर १२ पुरुषांमागे एक पुरुष मानसिक आजाराला बळी पडतोय. याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल फोन व त्याद्वारे सोशल मीडियाचा अतिवापर असल्याची माहिती मीरारोड येथील मनोविकार तज्ञ डॉ. सोनल आनंद यांनी दिली आहे.
मानसिक आजाराच्या बाबतीत महिलांचे प्रमाण चिंताजनक असुन मुंबई, दिल्ली, पुणे या शहरांतील तरुण पिढी २४ तासांपैकी ४ ते ५ पाच तास मोबाईलचा वापर करतात. मोबाईलचा वापर करताना त्यांचा मुख्य जगाशी संबंध तुटतो व ते एका आभासी जगामध्ये प्रवेश करतात. या आभासी जगामध्ये सर्वकाही आलबेल चालू असते व अचानक या आभासी जगामध्ये माणसाच्या भावना अथवा अहंगार दुखावला गेल्यास ते मनोरुग्ण ठरण्याची दाट शक्यता असते. मोबाईलमुळे गेल्या १० वर्षांमध्ये कुटुंबातील माणसांचा एकमेकांशी संवाद तुटला आहे. लोकांना मोबाईलद्वारे सोशल मीडियाचे व्यसन जडले आहे. वयाच्या दहाव्या वर्षीच मुले मी कसा दिसतो अथवा मी कशी दिसते यावर सोशल मीडियात २ ते ३ हजार लोकांकडून अभिप्राय मागवितात. या अभिप्रायावर त्या मुलाचा अथवा त्या मुलीचा मूड टिकून राहतो. जर या कोवळ्या वयातील सोशल मीडियाच्या वापरावर पालकांनी निर्बंध घातला नाही अथवा त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवले नाही तर त्या मुलांचे मानसिक रुग्णामध्ये रूपांतर होण्यास वेळ लागत नाही. एखाद्या व्यक्तीस मानसिक आजार झाला आहे, ही ओळखण्याची काही लक्षणे म्हणजे व्यक्तीची झोप बिघडणे, भूक कमी होणे, चिडचिड वाढणे, एकाकीपणा, दैनंदिन कामकाजात टाळाटाळ किंवा चूका करणे, वजन खूप कमी होणे किंवा वाढणे, खूप भिती वाटणे, आत्मविश्वास कमी होणे, जीव घाबरणे, कामाची इच्छा कमी होणे, आत्महत्येची धमकी देणे किंवा प्रयत्न करणे, मनात आत्महत्येचा विचार येणे इत्यादी होय. बालकांतील मनोविकारामध्ये प्रामुख्याने वर्तणूकीतील दोष किंवा विकृती, नैराश्य, अनामिक भिती इत्यादी लक्षणे दिसून येतात. हल्ली तीन वर्षाच्या मुलाच्या हातातही आपण हौसेने मोबाईल देतो. मात्र त्याचा त्याच्या कोवळ्या डोळ्यावर आणि मेंदूवर काय परिणाम होतो, याची कल्पना आपल्याला नसते. कार्यालयांत संगणकाचा वापर अनिवार्य असला तरी सोशल मिडियाद्वारे व्हाट्सॅप, फेसबुक यावर तरुणांचा किती वेळ वाया जातो याची जाणीव त्यांना करून देणे महत्वाचे ठरु लागले आहे. ब्रिटिश जर्नल आॅफ सायकिएॅट्रीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरात दरवर्षी ५० लाख लोकं मन:स्थितीतील बिघाड आणि चिंताग्रस्त झाल्याने मृत्युमूखी पडतात. सध्या जगभरात ४५ कोटींपेक्षाही जास्त लोक मनोरुग्ण ठरले आहेत. तर पाच कोटी भारतीय अशा मानसिक आजारासोबत लढा देत आहेत. २०२२ पर्यंत जगात ‘नैराश्य’ हा दुसरा सर्वात मोठा आजार ठरण्याची शक्यता असुन मुंबई महापालिकेने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातुन ७३ लाख नागरिकांमध्ये ३१ टक्के मानसिक रुग्ण म्हणजेच २२ लाखाहून अधिक लोकं मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे स्पष्ट केल्याचे डॉ. सोनल यांनी सांगितले. त्यामुळे सोशल मिडीयाचा अतिवापर टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.