लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कर्तव्यात कसूर केली नसतानाही झालेल्या खोट्या आरोपामुळे झालेला मानसिक छळ आणि बदनामीप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी; अन्यथा बेमुदत उपोषणाशिवाय पर्याय नाही, असा पवित्रा केडीएमसीतील लिपिक दीपक शेलार यांनी घेतला आहे. याआधी सचिव कार्यालयातील कर्मचारी विनायक गोडे यांच्या निमित्ताने मानसिक छळाचा प्रकार समोर आला होता, शेलार यांच्याबाबतीतही असाच प्रकार घडला असून नि:पक्षपातीपणे सखोल चौकशी व्हावी आणि न्याय मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.शेलार हे पारगमन शुल्क विभागात कार्यरत असताना ३ फेब्रुवारी २०१४ ला सकाळी ६ ते दुपारी २ या कालावधीत गांधारी नाक्यावर त्यांनी फिनेल भरलेली गाडी पारगमन शुल्क वसूल न करता सोडली, असा आरोप त्यांच्यावर ठेवला होता. त्यांच्यावर महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवत त्यांची खातेनिहाय चौकशी केली. परंतु यात त्यांच्यावरील आरोप सिध्द होऊ शकला नाही. शेलार यांनी संबंधित वाहनाची पारगमन शुल्क रक्कम १०० रूपये वसुल करून त्याची पावती सादर केली आहे. ती रक्कम महापालिकेच्या फंडात जमा करण्यात आलेली आहे. त्यामुळे महापालिकेचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही. यात त्यांनी कर्तव्यात कोणत्याही प्रकारची कसूर केल्याचे स्पष्ट होत नसल्याचा निष्कर्ष चौकशी अधिकाऱ्यांनी काढला आहे. या छळाप्रकरणी शेलार यांनी १ मे ला कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी त्यांची समजूत काढत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आयुक्तांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले होते. तसेच पोलिस प्रशासनानेही त्यांना आत्मदहन करण्यापासून परावृत्त केले होते. त्यामुळे शेलार यांनी आत्मदहनाचा निर्णय तूर्त स्थगित केला होता. याउपरही न्याय मिळत नसल्याने त्यांनी आता बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
खोट्या आरोपामुळे मानसिक छळ"
By admin | Published: June 19, 2017 3:45 AM