ठाणे : सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षण या विषयानिमित्त महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुंटुबांची माहिती एका प्रश्नावली मार्फत भरून घेण्यात येत आहे. परंतू या सर्वेक्षणात खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करताना चांद्रसेनिय कायस्थ प्रभु या (सीकेपी असा सर्वसाधारणपणे उल्लेख केला जाणारी) जातीची नोंदच नसल्याने सीकेपी समजाने याबाबत संताप व्यक्त केला आहे. या सर्वेहक्षणात या ज्ञातीचा उल्लेख होण्याची मागणी अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभु मध्यवर्ती संस्थेने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्रातल्या इतर सर्व जातींचा त्यांच्या उपजातींसह उल्लेख या सर्वेक्षणानिमित्त तयार केलेल्या तक्त्यांवर / टॅब वर आढळतो मात्र आमच्या चांद्रसेनिय कायस्थ प्रभू या ज्ञातीचा उल्लेख नसणे किंवा आलेल्या अधिकाऱ्यांनाही याबद्दल माहिती नसणे हे अनाकलनीय आहे व संतापजनकही आहे असे या समाजाचे म्हणणे आहे.
छत्रपती शिवाजी महारांजांच्या स्वराज्यात बलिदान देणारे नरवीर बाजीप्रभू देशपांडे, महाराजांच्या सेवेत असलेले बाळाजी आवजी चिटणीस, १८५७ च्या स्वतंत्र संग्रामातील एक महत्वाचे नाव रंगो बापूजी गुप्ते, स्वतंत्र भारताचे अर्थमंत्री रायगडचे सुपुत्र सर सी. डी. देशमुख, जनरल अरुणकुमार वैद्य, एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस, महाराष्ट्राचे शेक्सपिअर असा उल्लेख असलेले भाषाप्रभू राम गणेश गडकरी, प्रबोधनकार ठाकरे, संगीतकार श्रीनिवास खळे या व यांच्यासारख्या शेकडो महान व्यक्तिरेखा ज्या ज्ञातीतून पुढे आल्या त्या ज्ञातीचा साधा उल्लेखही सरकार दरबारी नसणे यामुळे चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाज बांधवांची मने दुखावली आहेत असे भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभु मध्यवर्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष समीर गुप्ते यांनी पत्रात नमूद केले आहे. आमच्या या ज्ञातीबद्दल आपल्या अधिकाऱ्यांना अज्ञान असणे हे आश्चर्यजनक आहे. म्हणून आपण जातीने लक्ष घालून आमच्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभु या ज्ञातीचा उल्लेख या व यापुढील कोणत्याही सर्वेक्षणात केला जाईल यासाठी आयोगास योग्य आदेश द्यावेत व शक्य तितक्या तातडीने या ज्ञातीचा उल्लेख सध्या सुरु असलेल्या सर्वेक्षणही व्हावा अशी मागणी केली आहे.