मीरा रोड : मीरा-भार्इंदरच्या महापौरपद निवडणुकीनिमित्ताने शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांनी संयुक्तपणे ही निवडणूक लढवण्याचे ठरविले आहे. अर्थात भाजपाला पूर्ण बहुमत असल्याने तशीही सोमवारी होणारी ही निवडणूक औपचारिकताच बनली आहे. त्यासाठी गुरूवारी अर्ज भरण्यात आले.भाजपातर्फे आमदार नरेंद्र मेहता यांच्या भावजय डिम्पल आणि उपमहापौरपदासाठी अनुभवी नगरसेवक चंद्रकांत वैती यांनी अर्ज भरले. भाजपाने डमी म्हणून महापौरपदासाठी वंदना भावसार, तर उपमहापौरपदासाठी राकेश शहा यांचाही अर्ज भरला आहे.शिवसेनेतर्फे महापौरपदासाठी अनिता पाटील यांचा; तर काँग्रेसचे अनिल सावंत यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला.नगर सचिव वासुदेव शिरवळकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भार्इंदर पश्चिमेच्या बावन जिनालय जैन मंदिराजवळील मेहता यांच्या कार्यालयाजवळून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी डिम्पल मेहता व वैती यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी, आमदार मेहता, डिम्पल व त्यांचे पती विनोद यांनी जैन मुनींचे आशीर्वाद घेतले.सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत. निवडणूक दुपारी १२ वाजता होईल. तेव्हा वंदना भावसार व राकेश शहा अर्ज मागे घेतील.
मीरा-भार्इंदर महापौरपद निवडणूक: शिवसेना आणि काँग्रेस पुन्हा एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 5:52 AM