मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये नव्याने बांधलेल्या काँक्रिटच्या रस्त्यांना जागोजागी मोठे तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी तर वरचे काँक्रिटच उडून गेले आहे. काँक्रिटच्या रस्त्यांचा मोठा गाजावाजा करत त्याचे राजकीय श्रेयासाठी सत्ताधारी भाजपाची धडपड सुरू आहे. कोट्यवधींच्या कामांमध्ये भ्रष्टाचार होऊन ती निकृष्ट दर्जाची झाली आहेत. पालिकेने डांबरीकरणाऐवजी काँक्रिटचे रस्ते बनवण्याची मागणी होत होती. मात्र, पालिकेकडे तेवढा निधी नसल्याने प्रस्ताव प्रलंबित होता. दरम्यान, सरकारचा विशेष निधी व पालिकेचा सार्वजनिक निधी एकत्र करून रस्ते बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला. सत्ताधारी भाजपाने काँक्रिटच्या रस्त्यांचे काम करण्यासाठी आग्रह धरला. भार्इंदर फाटकनाका ते इंदिरा कोठारपर्यंतच्या सुमारे २ कोटी खर्चाच्या काँक्रिट रस्तेकामाची सुरुवात केली. त्याचे भूमिपूजन भाजपा आमदार नरेंद्र मेहतायांनी करून शहरात काँक्रिट रस्ते बांधण्याचे श्रेय घेत प्रसिद्धी केली. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे जमिनीतील नळवाहिनी, विद्युत व दूरध्वनी केबल आदींचा अडथळा आला. यात काही महिने काम रखडले. त्यानंतर, रस्त्याचा मोजकाच भाग पूर्ण करून पुढील अर्धा रस्ता अर्धवट ठेवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, ९० फुटी मार्ग, जेसल पार्क, काशिमीरानाका, न्यू गोल्डन नेस्ट मार्ग आदींचा काही भागच काँक्रिटचा करण्यात आला. रस्त्यांचे अर्धवट काँक्रिटीकरण केल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. नव्याने बनवलेल्या रस्त्यांना तडे गेले आहेत.काँक्रिटकिरण केलेल्या रस्त्याच्याबाजूची कामेही झालेली नाहीत. यामुळे मोठा गाजवाजा करत काँक्रिट रस्तेबांधणी सुरू केल्याची टिमकी वाजवणाऱ्यांची कोंडी झाली आहे.निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियामधूनही निकृष्ट दर्जाच्या काँक्रिट रस्त्यांबद्दल टीकेची झोड उठत असल्याने भाजपाची अडचण आहे."मी उद्या या सर्व रस्त्यांची पाहणी करणार आहे. पाहणी केल्यावर त्याबद्दल बोलेन. - शिवाजी बारकुंड, शहर अभियंता माझ्या माहितीनुसार काम खूप चांगले झाले आहे. अधिकाऱ्यांचे कौतुक केले पाहिजे. तडे गेले आहेत व सिमेंट उडाले आहे, ती जबाबदारी कंत्राटदाराची आहे. - डॉ. राजेंद्र जैन, नगरसेवक नागरिकांच्या पैशांचा दुरुपयोग आहे. रस्त्यांची कामे अर्धवट व निकृष्ट दर्जाची झाली आहेत. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. - संजय गोहिल, नागरिक सत्ताधारी भाजपा व पालिका यांच्या संगनमताने हा कोट्यवधींचा काँक्रिट रस्ते घोटाळा आहे. दोषींवर कारवाई करण्यासह याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे. - मिलन म्हात्रे, माजी नगरसेवक
मीरा-भार्इंदरमध्ये नवीन काँक्रिट रस्त्यांना तडे लोकमत न्यूज नेटवर्क
By admin | Published: July 03, 2017 6:16 AM