ठाणे: ठाण्यातून जाणाऱ्या पूर्व द्रुत गती मार्गावरील तीन हात नाका उड्डाणपूल उतरताना ठाण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरती मर्सिडीज बेंझ कार चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे ही कार उलटल्याची घटना सोमवारी पहाटे २ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास घडली. सुदैवाने या कारमधील पाच ही जणांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, अपघातग्रस्त कारमधील सांडलेल्या तेलावर माती पसरवून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
कार मालक व चालक मोहम्मद आक्रम निर्माण यांच्यासह आणखी चार जण हे सोमवारी पहाटे भिवंडी, आलहिंद धाबा ते मुंबईकडे ठाणे मार्गे निघाले होते. त्यांची कार पावणेतीन वाजण्याच्या सुमारास पूर्व द्रुतगती मार्गावर तीन हात नाका पूल उतरताना निर्माण यांचा कारवरील ताबा सुटला आणि कार उलटली. यावेळी कारमधील तेल रस्त्यावर पसरले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तसेच नौपाडा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी धाव घेतली.
सुदैवाने कारमधून प्रवास करणाऱ्या कोणालाही दुखापत झाली नसल्याचे समोर आले. घटनास्थळी एका हायड्रा मशीनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. सांडलेल्या तेलावर माती पसरवून तो रस्ता आपत्ती व्यवस्थापन विभागाने वाहतुकीसाठी मोकळा केला. यावेळी कारमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा असे पाच प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.