ठाणे : व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याने ठाण्यातील १० जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय ठाण्यातील काही तरुण व्यापाऱ्यांनी घेतला असतानाच आता जुन्याजाणत्या व्यापाऱ्यांनी या भूमिकेला कडाडून विरोध केल्याने व्यापाऱ्यांत फूट पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात निवडणूक लढवण्याची भाषा करणाऱ्या व्यापाऱ्यांचा बोलवता धनी भाजपा असल्याची चर्चा होती, तर आता त्याविरोधात उभ्या राहिलेल्या जुन्याजाणत्या व्यापाऱ्यांमागे शिवसेनेचे नेते असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय जाहीर केला होता. जो पक्ष आम्हाला १० जागा देईल, त्यांच्याबरोबर आम्ही राहू, अन्यथा आम्हीच १० जागा लढवू, असा दावा या व्यापाऱ्यांनी केला होता.परंतु, आता व्यापाऱ्यांच्या या निर्णयाचा दुसऱ्या गटाने विरोध केला असून सर्वांचे मत विचारात न घेता निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करणे चुकीचे असल्याचे मत रविचंद्र छेडा, प्रकाश सावला, सुरेशभाई राजावत, जयंतीभाई रांका, अशोक पारेख आदींसह इतर ज्येष्ठ व्यापाऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आमचा कोणत्याही पक्षाला पाठिंबा नसल्याचा दावाही त्यांनी केला. काही व्यापारी समस्या सोडवण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरत असताना त्यांच्याच काही बांधवांनी पाय खेचण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)विरोध करणाऱ्यांचा बोलवता धनी शिवसेनाव्यापारीवर्गातील चर्चेनुसार ज्या व्यापाऱ्यांनी निवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केला, त्यांना भाजपानेच शिवसेनेविरोधात पुढे केले असल्याची माहिती आहे, तर आता ज्या व्यापाऱ्यांनी निवडणूक लढवण्यास विरोध केला, त्यांचा ‘बोलवता धनी’ शिवसेना आहे. युती तुटल्यानंतर ठाण्यात त्याचे पडसाद व्यापारीवर्गातही उमटले असून व्यापाऱ्यांमध्येदेखील आता शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक रंगतदार होणार आहे.
व्यापाऱ्यांची ‘युती’ही फुटली
By admin | Published: January 29, 2017 3:17 AM