लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : डोंबिवलीतील वाहतूक कोंडी आणि त्यातून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे त्रस्त झालेल्या केळकर रोडवरील व्यापाऱ्यांनी मंगळवारी दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. कोंडीला कारण ठरत असलेला त्या रस्त्यावरील रिक्षा स्टँड हलवावा, अशी व्यापारी, रहिवाशांची प्रमुख मागणी आहे. त्याकडे आणि वाहतूक वळवण्याकडे वाहतूक विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा निषेध म्हणून काही काळ हा बंद पाळण्यात आला. केळकर रोडवरील रिक्षा स्टँड बंद करावा, तेथे प्रवासी उतरवण्याची सोय बंद करावी. इंदिरा गांधी चौकातून रिक्षा केळकर रोडमार्गे पश्चिमेला जातील, अशी सोय करण्याची मागणी स्थानिकांसह व्यापाऱ्यांनी केली. या मागणीकडे वाहतूक विभाग कानाडोळा करत आहे, असा आरोप करत व्यापाऱ्यांनी शहर वाहतूक नियोजन विभागाचा निषेध करत अर्धा दिवस दुकाने बंद ठेवली. त्यावर या प्रश्नात सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यात जो निर्णय होईल, त्याची अंमलबजावणी करण्यास आम्ही कटीबद्ध असल्याचा पवित्रा वाहतूक विभागाने घेतला. रविवारी रात्री उशिरापर्यंत झलेली कोडी, वाहनांचे आवाज, धूर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी रिक्षा वाहतूक बंद करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. पण त्यावर मार्ग न निघाल्याने सोमवारी रात्री त्यांनी एकत्र येत मंगळवारी बंद पाळण्याचा निर्णय जाहीर केला. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास व्यापारी एकत्र आले. स्थानिक नगरसेवक मंदार हळबे, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी सुभाष पाटील, रहिवाशांचे प्रतिनिधी घुले, तसेच मनसेचे शहर अध्यक्ष मनोज घरत यांच्यासमवेत व्यापाऱ्यांनी आधी दुकाने बंद केली. त्यानंतर डोंबिवली शहर वाहतूक नियोजन विभागाच्या कार्यालयात जाऊन कोंडी कधी व कशी फुटणार याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब आव्हाड, डोंबिवलीचे अधिकारी गोविंद गंभीरे, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांंशी चर्चा केली. केळकर रोडवरील वाहतूक केवळ त्या परिसरातील नसून संपूर्ण शहरातील आहे. त्यामुळे केवळ एखादे रहिवासी मंडळ एकत्र येऊन या प्रश्नावर निर्णय घेता येणार नाही. त्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, स्थानिक, महापालिका, आरटीओ अधिकारी यांच्यासह स्थानिक पोलीस यंत्रणेने एकत्र येणे गरजेचे आहे. त्या शिवाय या गंभीर विषयावर तोडगा निघू शकत नाही, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. त्यासाठी नागरिकांनीच सगळयांना एकत्र बोलवावे, त्या बैठकीला वाहतूक विभागातर्फे आम्ही येऊ. त्यात सर्वानुमते जे ठरेल त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आमची असेल, असेही आव्हाड, गंभीरे म्हणाले. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा आहे. सध्या केळकर रोडवरची समस्या सोडवा, असा पवित्रा पाटील यांनी घेतला. तेव्हा ती कशी सोडवायची हे सांगा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले. राथ रोड, उर्सेकरवाडीतील रस्ते मोकळे होणे गरजेचे १डोंबिवली स्टेशनला समांतर असलेला राथ रोड पालिकेने फेरीवाल्यांना आंदण दिला आहे. त्यावरून परिवहन सेवा सुरू करण्याचे आश्वासन प्रत्यक्षात आलेले नाही. मात्र तो रस्ता आणि उर्सेकरवाडीतून पाटकर रोडपर्यंत जाणारा रस्ता असे दोन समांतर रस्ते जर पूर्णत: वापरात आले तर केळकर रोडवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे मत काही व्यापाऱ्यांनी मांडले. २सध्या रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडले तर पाटकर रोडचा काही भाग वगळल्यावर थेट सर्व वाहतूक केळकर रस्त्यावर येते. राथ रोड आणि उर्सेकरवाडीतील रस्त्यावरून फारशी वाहतूक होत नाही. हे रस्ते रूंद करूनही फक्त फेरीवाल्यांना आंदण दिले आहेत. त्यामुळे त्जोवर त्या रस्त्यांवरून वाहतूक वळवली जात नाही, तोवर तेथील फेरीवेल हटणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ३फेरीवाल्यांचे हितसंबंध जपण्याऐवजी पालिका आणि लोकप्रतिनिधींनी हे रस्ते पूर्णपणे वापरात आणण्यास सहकार्य करायला हवे, असे त्यांचे म्हणणे आहे. राथ रस्त्यावरून परिवहन सेवेच्या बस आणि उर्सेकरवाडीतून अन्य पर्यायी सार्वजनिक वाहतूक सेवा आल्यास तेथे फेरीवाल्यांना बसताच येणार नाही. सतत वर्दळ सुरू राहील आणि हटवलेले फेरीवाले अडचणीत येतील, अशी त्यांची भूमिका आहे. या रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यास कोणीच विरोध करू शकणार नाही, असा त्यांचा दावा आहे.साठ्ये मार्ग रूंद करावाटिळक टॉकिज, पूजा-मधूबन टॉकिजच्या मागील बाजूने दाते मंगल कार्यालयावरून जाणारा रस्ता केळकर रस्त्याला मिळतो. तेथून तो रस्ता पुढे चिपळूणकर रस्त्याला मिळतो. त्या रस्त्याला साठ्ये मार्ग असे नाही देण्यात आले आहे. या रस्त्यावर सर्वत्र निवासी वस्त्यांत बेकायदा दुकाने, व्यापारी गाळे थाटले आहेत. हा रस्ता रूंद करून त्यावरून एकेरी वाहतूक वळवली, तरीही स्टेशन परिसरातील कोंडी कमी होऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
रिक्षा स्टँडविरोधात व्यापाऱ्यांचा बंद
By admin | Published: June 21, 2017 4:27 AM