धीरज परब मीरा रोड : लाच म्हणून विदेशी दारूच्या बाटल्या स्वीकारताना मीरा-भार्इंदर महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव याला अटक केल्याने जन्म तसेच मृत्यूचे दाखले देण्याचे काम ठप्प झाले आहे. केंद्र शासनाच्या नागरी नोंदणी प्रणालीद्वारे सदर दाखले देताना वैद्यकीय अधिका-याने लॉग इन करून त्याची डिजिटल स्वाक्षरी लागते. पालिकेने तातडीने नवीन वैद्यकीय अधिका-यांकडे पदभार न दिल्याने ही अडचण निर्माण झाली आहे.केंद्र शासनाच्या जनगणना संचालनालयाच्या माध्यमातून आता जन्म तसेच मृत्यूची नोंदणी होत आहे. त्यासाठी नागरी नोंदणी प्रणाली (सिव्हील रजिस्ट्रेशन सिस्टीम) अमलात आणण्यात आली. देशात एकसमान जन्म वा मृत्यू प्रमाणपत्रे दिली जातात. मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीत जन्म झालेल्यांची माहिती रुग्णालयांमार्फत आॅनलाइन प्राप्त होते.जन्म दाखल्यांसाठी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात येऊन आवश्यक माहिती देताना अर्ज, कागदपत्रे सादर करावी लागतात. मृत्यू दाखल्यासाठी पालिकेकडून दहन वा दफन दाखला दिला जात असल्याने त्या आधारे नोंदणी केली जाते.आॅनलाइन नोंद केल्याने त्याची माहिती एकाच वेळी जनगणना विभागाच्या पुणे येथील उपमहानिबंधक कार्यालयात तसेच मुख्य जनगणना कार्यालयातदेखील याची माहिती अपलोड होते. पडताळणी झाल्यावर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाºयांच्या युजर आयडीद्वारे लॉग इन करून त्यांची डिजिटल स्वाक्षरी होऊन जन्म वा मृत्यूचे प्रमाणपत्र मिळते. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांच्याकडे मीरा-भार्इंदर हद्दीतील जन्म व मृत्यू दाखल्यांवर डिजिटल स्वाक्षरी करून ते दाखले देण्याचे अधिकार आहेत. त्यासाठी त्यांचे युजर आयडी लॉग इन करावे लागते.मात्र, एका वैद्यकीय अधिकाºयास पालिकेचे नियुक्तीपत्र देण्यासाठी विदेशी मद्याची लाच मागितली होती आणि ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी शनिवारी सापळा रचून सुमारे १६ हजारांच्या विदेशी दारूच्या बाटल्या स्वीकारताना डॉ. जाधव याला रंगेहाथ अटक केली.डॉ. जाधव याच्या अटकेमुळे त्याचे जन्म व मृत्यू दाखला नोंदणी प्रमाणपत्र मंजूर करण्याबद्दलचे युजर आयडी वापरणे तसेच त्याची डिजिटल स्वाक्षरी वापरायचे कसे, अशी समस्या निर्माण झाली आहे, जेणेकरून जन्म तसेच मृत्यू दाखले देण्याचे काम ठप्प झाले आहे. शिवाय, लाचप्रकरणी अटक झाल्याने डॉ. जाधव यांचे निलंबन निश्चित आहे.त्यामुळे डॉ. जाधव याच्या अटकेनंतर पालिकेने तातडीने प्रभारी वैद्यकीय अधिकारी नेमणे आवश्यक होते. कारण, नवीन अधिकारी नेमल्यावर त्याच्या डिजिटल स्वाक्षरीसाठी पुणे तसेच दिल्ली येथील कार्यालयांकडून आॅनलाइन मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर, युजर आयडी ओपन करून डिजिटल स्वाक्षरीचा वापर करता येणार आहे. पण, तोपर्यंत जन्म आणि मृत्यू दाखले देण्याचे बंद झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ही सुविधा लवकरात लवकर सुरू करावी, अशी त्यांची मागणी आहे.
मीरा - भार्इंदरमध्ये जन्म-मृत्यू दाखले देण्याचे काम झाले ठप्प वैद्यकीय अधिका-याला अटक : नवीन अधिका-याची नियुक्ती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 1:58 AM