डोंबिवली : ‘सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका,’ असा संदेश देण्यासाठी ‘नया सवेरा’ संस्था आणि ‘डोंबिवली वुमन्स वेल्फेअर असोसिएशन’ने मंगळवारी शहरात जागृतीपर रॅली काढली. त्यात नर्सरीतील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, डॉक्टर यांनी सहभाग घेतला होता.संस्थेने थुंकीमुक्त गाव करण्याचा वसा घेतला आहे. संस्थेतर्फे त्यासाठी दर महिन्याला समुपदेशन करण्यात येते. डोंबिवली परिसरातील प्रमुख ठिकाणी, रहदारीच्या ठिकाणी, भाजीमंडई तसेच रिक्षाचालक, रुग्ण यांना समुपदेशन केले जाते.
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संस्थेच्या प्रमुख डॉ. स्वाती गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखील शहरात रॅली काढण्यात आली. भागशाळा मैदान येथून या रॅलीला प्रारंभ झाला. पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल, टंडन रोड, राजेंद्रप्रसाद रोड, टिळक पुतळा, सर्वेश हॉल या मार्गेने ही रॅली गेली. तिचा समारोप इंदिरा गांधी चौकात करण्यात आला. यंदाचे रॅलीचे हे पाचवे वर्ष होते. २०० ते २५० जणांनी या रॅलीत सहभाग घेतला होता. त्यामध्ये के. आर. कोठेकर महाविद्यालय, मॉडेल स्कूल, सेंट जोसेफ स्कूल, सेंट मेरी कॉलेज, नर्सरीतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीचे खास आकर्षण बैलगाडी होती. त्यातूनही नागरिकांना संदेश देण्यात आला.या वेळी महापौर विनीता राणे, शिक्षक वारके, नितीन जोशी, वैशाली काळे, रसिका पाटील, आनंदा अग्रवाल, गीता कुलकर्णी, म.न. ढोकळे, संगीता पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.