डोंबिवली - हिंदू नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी डोंबिवलीत काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेत ढोलताशा पथकांचे शिस्तबद्ध वादन आणि लेझिमचा तालावर फेर धरणारे शाळकरी विद्यार्थी यांचा जल्लोष पाहावयास मिळाला. या तालावर यात्रेत सहभागी झालेले विविध संस्थांचे चित्ररथ आपआपला संदेश घेऊन पुढे सरकरत होते. तर काही ठिकाणी यात्रेत सहभागी असलेल्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत तर कुठे पुष्पवृष्टी केली जात होती. हा स्वागत यात्रेचा डौल, जल्लोष आणि संदेश पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी एकच गर्दी केली होती.शहराच्या पश्चिम भागातील भागशाळा मैदान येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभापती राहूल दामले व माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी गुढीचे पूजन केले. त्याचबरोबर पालखी पूजन करुन यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यंदाच्या स्वागत यात्रेची थीम नागरीकांची कर्तव्ये, सुंदर व स्वच्छ डोंबिवली अशी असल्याने डोंबिवली गणेश मंदिराने भारतीय राज्य घटनेची उद्देशीका व नागरीकांच्या कर्तव्ये असा भला मोठा फलक व चित्ररथच तयार केला होता. यात्रेत ढोल ताशा पथकाला ढोल ताशा वादनाची परवानगी देण्यात आले होती. त्यात २० ढोल व ताशे वादनाची मुभा दिली गेली होती.मनोदय ट्रस्टच्या वतीने प्रत्यक्ष संवादावर भर द्या. सोशल मिडियामुळे प्रत्यक्ष संवाद होत नसल्याचे नमूद केले होेते. मनशक्ती केंद्राच्या वतीने स्मार्ट पिढी ही चारित्र्य संपन्न व्हावी असे आवाहन केले होते. प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने व्यसनमुक्तीचा संदेश दिला गेला. स. वा. जोशी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रीन इंडियाचा संदेश दिला. डोंबिवली सांस्कृतिक परिवाराच्या वतीने ई बँकिंगचा वापर करा असे आवाहन करण्यात आले. फीडींग इंडियाने अन्नाचा नास करु नका असा संदेश दिला. उर्जा फाऊंडेशनने आई बंगल्याजवळ प्लॅस्टीक मुक्तीचा संदेश देणारा देखावा चित्तारला होता. सायकल क्लबने फिट रहा तर कोकण कुणबी रहिवासी संघटनेने मोबाईल वापराचा अतिरेक टाळा असे चित्ररथ तयार केले होते. यात्रेवर पुष्पवृष्टीशहराच्या पश्चीम भागातील दीनदयाळ रोडवर भाजप नगरसेविका मनिषा धात्रक व नगरसेवक शैलेश धात्रक यांनी यात्रेवर पुष्पवृष्टी करुन जोरदार स्वागत केले. ब्राह्मण महासंघ व खान्देश मराठा सेवा संघाच्या वतीने यात्रेत सहभागी झालेल्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले जात होते. मराठावाडा विदर्भ रहिवासी संघाने पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती केली. डोंबिवलीची स्वागतयात्रा भाजपा शिवसेनाकडून हायजॅक डोंबिवलीची स्वागतयात्रा राज्यभर चर्चाचे विषय ठरत असतो. मात्र यंदा ही स्वागतयात्रा राजकीय पक्षांनी हायजॅक केल्याचे दिसून आले. डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानापासून पूर्वेतल्या गणेश मंदिरापर्यंत ही स्वागतयात्रा जाते. मात्र या संपूर्ण रस्त्यावर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाच्या वतीने झेंडे व बॅनरबाजी करण्यात आली होती. ग्रामीण भागात स्वागतयात्रेतून अध्यात्मिक संदेशडोंबिवली- पिंपळेश्वर महादेव भक्तमंडळ यांच्यातर्फे काढण्यात आलेल्या स्वागतयात्रेतून आध्यात्मिक संदेश देण्यात आला. तसेच मंदिरात ह.भ.प रमेश महाराज चाळीसगाव यांचे कीर्तन सादर क रण्यात आले. कीर्तनातून प्रबोधन करीत मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले.सोनारपाडा ते पिंपळेश्वर मंदिर आणि स्टार कॉलनी ते पिंपळेश्वर मंदिर अश्या दोन ठिकाणाच्या उपयात्रेचा समारोप पिंपळेश्वर मंदिरात होतो. या यात्रेत श्री गणेश मंडळ आणि शंखेश्वर नगर विद्यालय या दोन शाळेच्या लेझीम पथकाने सहभाग घेतला होता. अनंत संप्रदायाचे वारकरी दिंडीत सहभागी झाले होते. या स्वागतयात्रेत १ ते २ हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. स्वागतयात्रेत आणि कीर्तनात सहभाग घेणाऱ्या नागरिकांसाठी मंदिरातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती प्रकाश म्हात्रे यांनी दिली.
डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेत जल्लोष, नागरी कर्तव्ये जपण्याचा दिला संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 2:32 PM