मीरारोड -
मीरा भाईंदर महापालिकेच्या मार्फत काही हजार नागरिकांना मालमत्ता कर भरलेला असून देखील व्याजाची रक्कम समाविष्ट करून कर भरण्याचे संदेश आल्याने नागरिकां मध्ये गोंधळ उडून नाराजी पसरली आहे. महापालिकेने नागरिकांना ऑनलाईन कर भरण्यासाठी सतत आवाहन चालवले असून ऑनलाईन कर भरणाऱ्यांना काहीशी प्रोत्साहनपर सवलत दिली जाते. ऑनलाईन कर भरणा केल्याने त्या कर धारक नागरिकांचे भ्रमणध्वनी क्रमांकाचा डाटा पालिके कडे उपलब्ध झाला आहे.
सदर ओनलाईन कर वसुली यंत्रणा हि बँकऑफ बडोदा मार्फत राबवली जाते . पालिकेने ते काम सदर बँकेस दिले आहे . महानगरपालिके मार्फ़त मालमत्ता कर वसुलीसाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासाठी महानगर पालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांना त्यांच्या फोनवर एसएमएस पाठवले जात आहेत.
परंतु शहरातील काही हजार नागरिकांना मालमत्ता कर भरलेला असून सुद्धा थकबाकीचे संदेश पाठवले गेले. त्यात व्याज - दंड समाविष्ट करून मालमत्ता कराची रक्कम भरण्यास सांगण्यात आले. ज्यांनी कर भरला नाही त्यांना संदेश जाणे अपेक्षित असताना कर भरलेल्या नागरिकांना सुद्धा थकबाकी असल्याचे संदेश आल्याने लोकांचा गोंधळ उडाला. कर भरून सुद्धा संदेश आला म्हणून अनेकांनी पालिकेच्या मुख्यालयात तसेच प्रभाग कार्यालयां मध्ये धाव घेतली.
चूक लक्षात आल्या नंतर पुन्हा संदेश पाठवण्यात आला. मालमत्ता कराचा भरणा करूनही एसएमएस प्राप्त झाला असल्यास तो एसएमएस रद्द समजण्यात यावा असे संदेश मध्ये नमूद करण्यात आले. वास्तविक ऑनलाईन कर भरणा केल्याने सुमारे दीड लाख करधारकांचे भ्रमणध्वनी क्रमांक सिस्टम मध्ये आहेत. त्यापैकी सुमारे ९० हजार थकबाकीदारांना कर भरला नसल्याचे संदेश पाठवायचे होते. मात्र तांत्रिक गडबडी मुळे कर भरलेल्या सुमारे २५ हजार नागरिकांना सुद्धा व्याज व दंडासह कर थकीत असल्याचे संदेश गेल्याची माहिती एका पालिका अधिकाऱ्याने दिली. सदर प्रकार लक्षात आल्या नंतर दुसऱ्या दिवशी कर भरला असल्यास एसएमएस रद्द समजावा असे सुधारित संदेश पाठवण्यात आले.