अजित मांडकेठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमध्येही अनेकांनी आपले वेगळेपण जपले आहे. असेच काहीसे वेगळेपण आणि घरात राहून कोरोनाला हरविण्याचा निर्धार करीत १४० जणांच्या एका कुटुंबाने एकोप्याबरोबरच एकतेचा संदेश देण्याचे कामही केले आहे. ठाणे,मुंबई, अंबरनाथ, बडोदा आदींसह इतर ठिकाणावरील हे कुटुंबांतील सदस्य एकत्र येत असून रोज नवनवीन स्पर्धांचे आयोजन करीत आहेत. त्यातूनच ते घरात राहून कोरोनावरही मात करीत आहेत. लॉकडाऊनचा कालावधी लवकर संपविला जावा अशी मागणी अनेक स्तरातून अनेक नागरीकांकडून केली जात आहे. त्यात लॉकडाऊनचा कालावधी कसा घालवावा असा प्रश्नही अनेकांना सतावत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लघन करुन अनेक जण रस्त्यांवर फिरतांना दिसत आहे. परंतु ठाण्यात असेही एक कुटुंब आहे, जे या लॉकडाऊनचा सदुपोयग करतांना दिसत आहे. घोडबंदर भागातील ब्रम्हाड येथे वास्तव्यास असलेल्या साक्षी ठाकूर यांनी त्यांच्या कुटुंबाबत ही माहिती दिली आहे. त्यांच्या या कुुटंबात १४० सदस्य आहेत. कोणी ठाण्यात, अंबरनाथ, बदलापुर, मुंबई, घाटकोपर, बडोदा आदी ठिकाणी हे सर्व सदस्य वास्तव्यास आहेत. परंतु या लॉकडाऊनच्या काळात हे सर्व सदस्य आपला वेग अगदी मस्त मजेत घालवत असल्याचे त्यांनी सांगितले. या लॉकडाऊनच्या कालावधीत रोज वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये केशबुशा, बो बांधण्याची स्पर्धा, वेशभुषा, गाण्यांच्या, गप्पांच्या, गोष्टी आदी स्पर्धांबरोबरच शुक्रवारी या कुटुंबांतील प्रत्येक पुरषाने घरातील महिलांसाठी जेवण तयार करायचे असे प्लनींग झाले. त्यानुसार पुरुष मंडळींनी देखील यात हिरीरीणे सहभाग घेतला, कोणी चपात्या केल्या, कोणी व्हेज, तर कोणी नॉनव्हेजच्या विविध डीश तयार केल्या. या स्पर्धांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाला घरात राहूनच कोरोनाला हरवा असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. याचाच एक भाग म्हणून चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून स्टे होम सेफ होम, घरी रहा सुरक्षित रहा अशा आशयाचे मेसेज तयार करुन जनजागृती करण्याचा प्रयत्नही या मंडळींनी केला आहे. कोरानावर घरी राहून मात करता येऊ शकते हेच सांगण्याचा आमचा प्रयत्न असून या निमित्ताने उलट कुटुंबातील सदस्यांप्रती असलेली भावना आणखी दृढ झाली असून, एकोपा आणि एकतेचा संदेशच या कुटुंबांने दिला आहे.
लॉकडाऊनमध्ये १४० जणांच्या एका कुटुंबाने दिला एकतेचा संदेश, रोज नवनवीन स्पर्धांचे सोशल मिडियाच्या माध्यमातून आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 4:54 PM