ठाणे : गेल्या कित्येक वर्षांपासून अडथळ्यांच्या शर्यतीत असलेल्या वडाळा-घोडबंदर (कासारवडवली) मेट्रोचा नारळ अखेर सहा महिन्यांच्या आत, तोही ठाणे महापालिका निवडणुकीच्या आधी फोडण्याचा निर्धार झाला आहे. परंतु, आता मेट्रोच्या आराखड्यात काही बदल सुचवले असून, सुरुवातीला ठाण्यातील मेट्रो भुयारी मार्गातून जाईल, असे निश्चित केले होते. मात्र, आता ती एलिव्हेटेड करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. येत्या दोन महिन्यांत आराखडा अंतिम होऊन पुढील कामास सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून क्लस्टरपाठोपाठ मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपामध्ये मात्र कलगीतुरा रंगणार असल्याचे चित्र यानिमित्ताने निर्माण झाले आहे.वडाळा ते घोडबंदर-कासारवडवली या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाला २०१४ मध्ये मंजुरी मिळाली होती. परंतु, याचा खर्च अधिक असल्याने या मुद्यावरून या प्रकल्पाचे काम रखडले होते. मात्र, मागील काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने हिरवा कंदील मिळाला आहे. तसेच एमएमआरडीएच्या येत्या अंदाजपत्रकातही या योजनेसाठी तरतूद केली जाणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. ठाण्यातील मेट्रोच्या या कामासाठी सुमारे २०९१ कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे. तर, ३२ किमीच्या या मार्गामध्ये ३० स्थानके असणार आहेत. ठाण्यातील १३ स्थानकेदेखील भुयारीच असतील, असे सुरुवातीला स्पष्ट झाले होते. आता ठाण्यातील सर्व स्थानके उन्नत असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. क्लस्टरला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर श्रेय घेण्यासाठी ठाण्यात सध्या शिवसेना आणि भाजपामध्ये बॅनरयुद्ध रंगले आहे. आता येत्या सहा महिन्यांत मेट्रोचा नारळ फोडून भाजपाने या कामाचे श्रेय घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. > उन्नत स्थानकेएलबीएस-मुलुंडमार्गे ठाण्यातील तीनहातनाका ते ओवळा कारशेडपर्यंत १३ स्थानके प्रस्तावित असून यामध्ये तीनहातनाका, आरटीओ, वागळे, कॅडबरी, गोल्डन डाइज, कापूरबावडी, मानपाडा, पातलीपाडा, टिकुजिनीवाडी, आनंदनगर, वाघबीळ, कासारवडवली आणि ओवळा (कारशेड) अशी स्थानके त्यांनी दर्शवली आहेत. त्यानुसार, ही स्थानके उन्नत असणार आहेत.
सहा महिन्यांत फुटणार मेट्रोचा नारळ
By admin | Published: March 05, 2016 3:45 AM