कुलदीप घायवट
कल्याण : राज्य शासनाने मिशन बिगिन अगेनमध्ये मॉल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मॉल प्रशासक कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करून मॉल खुले केले आहेत. मुंबई, नवी मुंबई महापालिकेने शहरातील मॉल्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मेट्रो जंक्शन मॉल परिसर हॉटस्पॉट येत असल्याने मॉल बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, तांत्रिक कारणास्तव मॉल बंद असल्याचा फलक मॉलच्या प्रवेशद्वाराजवळ लावले आहे. त्यामुळे ग्राहकांचा मॉलच्या गेटवरून परतीचा प्रवास होत आहे.
मेट्रो मॉल हे कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथील ग्राहकांच्या विविध उपयोगी वस्तू खरेदी करण्याचे आकर्षण केंद्र आहे. मात्र मागील पाच महिन्यापासून मेट्रो मॉल बंद आहे. राज्य सरकार कोरोनासोबत लढताना परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार महानगरपालिकांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळेच मेट्रो मॉल बंद आहे. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत मॉलच्या दिशेने अनेक ग्राहक येतात. मात्र प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांकडून मॉल बंद असल्याचे सांगण्यात येते. ग्राहकांने बंद असल्याचे कारण विचारल्यास, महापालिकेने मॉल बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात येते. तसेच, तांत्रिक कारणांमुळे पुढील सूचना मिळेपर्यंत मॉल बंद राहील, असा फलक मॉलच्या प्रवेशद्वाराजवळ लावला आहे. त्यामुळे मॉलच्या दोन्ही प्रवेशद्वारापासून प्रवासी परत फिरतात.
मुंबई, नवी मुंबई महानगरपालिकेने मॉल्स सुरू ठेवले आहेत. येथील मॉल प्रशासकाने निर्जंतुकीकरण, स्वच्छता, कर्मचाऱ्यांना मास्क अशी खबरदारी घेतली आहे. कोरोना संदर्भातील उपाययोजना करून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेनेही मिशन बिगिन अगेन अंतर्गत मॉल सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.