मीरा रोड : मीरा- भार्इंदरमध्ये पाणी, मेट्रो आम्ही आणल्याचा दावा शिवसेनेचे नेते करतात. पण मुख्यमंत्री मी, एमएमआरडीएचा अध्यक्ष मी, फायलींवर मंजुरी देणारा मी... मग यांनी कशी काय कामे केली? हा प्रकार म्हणजे आमचं मूल आम्ही त्यांच्या घरी खेळायला पाठवलं आणि ते त्यांचं झालं अशातला प्रकार असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.निवडणुकीत भाजपा विरुध्द तिन्ही पक्ष विरोधात उतरले असले, तरी आम्ही त्यांना पुरुन उरू, असा दावा त्यांनी केला.मीरा-भार्इंदरसाठी दोन वर्षात जितका पैसा दिला तितका पैसा महापालिकेच्या स्थापनेपासून मिळाला नसेल. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी ७५ दशलक्ष लीटर पाण्याचे आधी आरक्षण केले. योजना मंजूर करून ती वेळेआधी पूर्ण केली. पण यातून पुरेसे पाणी मिळणार नाही याची माहिती असल्याने दोन हजार कोटींची सूर्या पाणी योजना मंजूर केली. भविष्यात नागरिकांना रोज पाणी मिळणार आहे. पुढील ४० वर्षापर्यंत पाण्याची समस्या राहणार नाही. रस्ते, भूमिगत गटार योजना, सांडपाणी प्रकल्प आदींसाठी पैसे दिले. आम्ही आधी पैसे दिले, कामे केली आणि मग मते मागायला आलो आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही पोलीस आयुक्तालय, तहसील कार्यालय बनवण्याचा निर्णय घेतला. बेकायदा घरांमध्ये राहणाºयांची घरे अधिकृत करण्याचा प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले. विविध प्रकारची महाविद्यालये शहरात सुरू करण्यासाठी विशेष मंजुºया देऊ. पालिका रुग्णालयाचे मल्टीस्पेशालिटीत रुपांतर होण्यासाठी पीपीपी तत्वावर चालवण्यास सरकार मदत करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.दीड वर्षात मेट्रोचे काम सुरु झाले नाही; तर संन्यास घेईन, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी चव्हाण तुम्हाला नागरिकांनी आधीच सन्यास दिला आहे, अशा शब्दात त्यांची खिल्ली उडवली.‘शिवसेनेचे बारा वाजवू’ : निवडणुकीत मुख्यमंत्री आणि मी मिळून शिवसेना, काँग्रेसचे बारा वाजवून टाकू. आधी काँग्रेसने मला शिकवले, की भाजपाविरुध्द बोला. म्हणून मी भाजपाविरोधात बोलत होतो. आता मोदींनी शिकवले म्हणून मी काँग्रेसविरोधात बोलतो. मोदी यांचे सरकार दलितविरोधी नाही. काँग्रेसवाल्यांनो, कुठेही जा, पण फिरुन नंतर भाजपा व आरपीआयमध्ये या असे जाहीर निमंत्रण रामदास आठवले यांनी दिले. शिवसेना आमच्यासोबत नाही, पण त्यांची गरज नाही. तुम्हाला सोबत घेतले असते, तर आरपीआयला चार तिकीटेसुद्धा मिळाली नसती, अशी टीका आठवले यांनी केली.
मेट्रोही आमची, पाणीही आमचेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 3:07 AM