ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वडाळा ते कासारवडवली मेट्रो प्रकल्पाला चालना देण्याच्या दृष्टीने या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ जुलै रोजी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांसमवेत तातडीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे ठाणे मेट्रो प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अधिवेशनादरम्यान ठाणे मेट्रो प्रकल्पाबाबत निर्णय न झाल्यास विधानसभेच्या पायरीवर उपोषणास बसणार असल्याचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री शिंदे यांना दिले होते. त्याच पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी विधानभवनातील आपल्या कार्यालयात या बैठकीचे आयोजन केले आहे. या वेळी एमएमआरडीएचे सहआयुक्त संजय सेठी, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर, ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जैस्वाल आदी अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.प्रत्येक अधिवेशनादरम्यान लक्षवेधी, औचित्याच्या मुद्याद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ठाण्यातील लोकप्रतिनिधींनी केला होता. परंतु, आश्वासनाव्यतिरिक्त कोणतीही कार्यवाही झाली नाही. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर गतवर्षीच्या अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी ठाणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन याच वर्षी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्यापही ठाणे मेट्रोला मंजुरी मिळाली नाही. त्यानंतर, निर्णय झालेल्या पुणे, नागपूर मेट्रो प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आलेले असतानाही ठाण्याच्या प्रकल्पाबाबत कोणताही निर्णय होत नव्हता. भूमिगत होणाऱ्या या प्रकल्पाला अवाढव्य खर्च होणार असून जर हा प्रकल्प एलिव्हेटेड झाला तर खर्च कमी होईल, असे मत व्यक्त करून एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी त्यास विरोध केला होता. (प्रतिनिधी)
मेट्रो प्रकल्प ‘पिकअप’ घेणार?
By admin | Published: July 24, 2015 3:28 AM