कल्याण : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेचे शेवटचे स्थानक कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रस्तावित आहे. मात्र, बाजार समितीने त्यांच्या जागेत स्थानक व कारशेड उभारण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे ते कल्याण एसटी बसडेपोच्या जागेत उभारावे, अशी सूचना मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी केली आहे. दरम्यान, शेख यांच्या सूचनेमुळे आणखी वादाला तोंड फुटले आहे.मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिलेल्या या मेट्रोमार्गात १६ स्थानके आहेत. कल्याण पश्चिमेला दुर्गाडी चौक, सहजानंद चौक आणि बाजार समिती ही तीन स्थानके आहेत. मेट्रोला शेवटच्या स्थानकाबरोबर कारशेडसाठीही बाजार समितीची जागा हवी आहे. मात्र, त्यास समितीचा विरोध आहे. कारशेड व स्थानक सर्वोदय मॉलसमोर व गोविंदवाडी बायपास रस्त्यानजीक उभारावे, अशी सूचना समितीने एमएमआरडीएकडे केली आहे. दुसरीकडे बाजार समितीच्या विरोधामुळे लक्ष्मी मार्केटची तीन एकरची जागा आहे. मात्र, ही जागा खाजगी असल्याने ती कशी घ्यायची, असा प्रश्न आहे. परंतु, या जागेचा प्रस्ताव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रस्ताव येण्याआधीच व्यापाºयांनी त्याला विरोध दर्शवला आहे.त्यापार्श्वभूमीवर शेख यांनी मेट्रोचे कल्याणमधील शेवटचे स्थानक व कारशेड एसटी डेपोच्या जागेवर उभारावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मेट्रोचा मार्ग दुर्गाडी, सहजानंद चौक व बाजार समिती याऐवजी दुर्गाडी, आधारवाडी, खडकपाडा, बिर्ला कॉलेज, सिंधीकेट ते कल्याण स्टेशन, असा केल्यास तो व्यावहारिक ठरेल. या मार्गामुळे कल्याण रेल्वे स्थानक व मेट्रो स्थानकाची जोडणी करणे शक्य होईल. १९७२ पासून कल्याणमध्ये एसटीचा बस डेपो आहे. मात्र, डेपोची वास्तू जर्जर झाली आहे. तिच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव सरकारदरबारी प्रलंबित आहे. त्यामुळे एमएमआरडीए बस डेपोची एअर स्पेस (वरील जागा) घेऊन खालच्या इमारतीचा विकास करून ती जागा सुसज्ज करून द्यावी. हे काम सरकारने एमएमआरडीएमार्फत करावे, असे शेख यांचे म्हणणे आहे.एसटीची पाच एकर जागा असून ती कल्याण स्थानकासमोरच आहे. त्यामुळे मेट्रोचे स्थानकही तेथे आल्यास प्रवाशांना फायदा होईल. घाटकोपर रेल्वेस्थानकाला जोडूनच मेट्रोचे स्टेशन आहे. त्यामुळे रेल्वेतून उतरल्यावर मेट्रो आणि मेट्रोतून उतरल्यावर रेल्वे, असे दोन्ही पर्याय प्रवाशांकडे आहेत. त्याचधर्तीवर कल्याणलाही रेल्वेस्थानकानजीक मेट्रोचे स्थानक घ्यावे. तसे झाल्यास प्रवाशांना रेल्वे, मेट्रो आणि एसटी बसचाही पर्याय मिळेल. प्रवासी मेट्रोतून उतरून नगर, नाशिक, पुणे, कोकणात जाण्यासाठी एसटी बस अथवा रेल्वेचा लाभ घेऊ शकतो, असे शेख यांनी नमूद केले.>एसटी डेपोच्या जागेवर केडीएमसीचाही डोळाएसटी डेपोच्या जागेवर केडीएमसीचाही डोळा आहे. केडीएमसीने ‘स्मार्ट सिटी’तून रेल्वे स्थानक परिसराच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. स्थानक परिसरातील हा डेपो खडकपाडा येथील महापालिकेच्या बस डेपो आरक्षणाच्या जागेवर हलवण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी मांडला होता. त्याला एसटीचे वाहकचालक कामगार संघटनांनी कडाडून विरोध केला होता. बस डेपो हलवल्यास प्रवाशांना कल्याण स्थानकातून बस पकडण्यासाठी रिक्षाने ६० रुपये खर्च करून खडकपाडा येथे जावे लागेल. रात्रीअपरात्री आलेल्या प्रवाशांना खडकपाड्याहून कल्याण स्थानकात येण्यास पुन्हा हाफ रिटर्नचे भाडे मोजावे लागेल. त्यामुळे डेपो स्थलांतराचा प्रस्ताव बारगळला होता. आता पुन्हा शेख यांनी मेट्रो रेल्वेच्या स्थानक व कारशेडसाठी डेपोच्या जागा सुचवल्याने त्याला विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मेट्रो स्थानक कल्याण एसटी डेपोवर बांधा, प्रवाशांचे हित जपण्याची केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 3:33 AM