- नारायण जाधवठाणे - जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली या तीन शहरांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो-५ साठी लागणारे कास्टिंग यार्ड ठाण्याच्या कोपरी आणि कावेसर येथे उभारण्याचा राज्याच्या नगरविकास विभागाचा आदेश या दोन्ही ठिकाणी वास्तव्य करणा-या हजारो लोकांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवणार आहे.दि. ३० जून २०१८ रोजी नगरविकास विभागाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यासाठी कोपरीतील सर्व्हे क्रमांक ८६ वरील २६.८८ हेक्टर, तर घोडबंदरच्या कावेसर येथील सर्व्हे क्रमांक ३११ ते ३१३ ची ९.६४ हेक्टर जमीन आरक्षित केली आहे. या जमिनीच्या भूसंपादनासह विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्तीही केली आहे. मात्र, या दोन्ही जागांवर दाट नागरी वस्ती आहे. सध्या या भागातील लोकप्रतिनिधी साखरझोपेत असले, तरी ज्यावेळी भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल, तेव्हा या कास्टिंग यार्डला स्थानिकांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४ आणि ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-५ चे एकत्रीकरण करून विस्तारित ठाणे-भिवंडी-कल्याण या २४.९ किमीच्या मेट्रोमार्गाचा डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवालास आॅक्टोबर २०१७ मध्ये राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यासाठी सुमारे ८४१६ कोटी ५१ लाख इतका खर्च प्रस्तावित केला आहे. यासाठी मार्च २०२१ ही डेडलाइन दिली आहे. त्यादृष्टीने आता ठाणे शहरात दोन ठिकाणी तिचे कास्टिंग यार्ड उभारण्यात येणार आहे.
अर्धा कोपरी विभाग नाहीसा होणारठाणे महापालिकेने क्लस्टरसाठीच्या आपल्या अर्बन रिन्युअल प्लानमध्ये कोपरी परिसराचा दोन टप्प्यांत विकास केला जाणार, असे नमूद केले आहे. यात कोपरी-१ मध्ये ४५.९० हेक्टर, तर कोपरी गावाच्या ५.९४ हेक्टरचा दुसºया टप्प्यात समावेश केला आहे.हे एकूण क्षेत्रच ५२ हेक्टर आहे. यापैकी २६ हेक्टर जमीन जर मेट्रोच्या कास्टिंग यार्डकरिता गेली, तर अर्धा कोपरी परिसर बाधित होणार आहे.महापालिकेच्या क्लस्टरला सर्व स्तरांतून विरोध होत असतानाच आता मेट्रोचे कास्टिंग यार्ड येऊ घातल्याने कोपरीसह कावेसर परिसरातील रहिवाशांवर विस्थापित होण्याचे दुहेरी संकट घोंगावत आहे.हजारो बांधकामांवर येणार गदा१यापूर्वीही कासारवडवली आणि गायमुख येथील मेट्रोच्या नियोजित कारशेडला आमदार प्रताप सरनाईकांसह स्थानिकांचा मोठा विरोध झाला होता. त्यामुळे आता कोपरी आणि कावेसर या दोन्ही कास्टिंग यार्डांची जमीन संपादित करण्याचे मोठे आव्हान एमएमआरडीएसमोर राहणार आहे.२त्यातच, कोपरी आणि कावेसर येथील प्रस्तावित कास्टिंग यार्डांच्या सर्व्हेवरील नियोजन प्राधिकरण म्हणून असलेले ठाणे महापालिकेचे अधिकार नगरविकास विभागाने ३० जूनच्या आपल्या त्या अध्यादेशात काढून घेतले आहेत. त्यामुळे पुढील पाठपुराव्यासाठी स्थानिकांना एमएमआरडीए किंवा थेट नगरविकास विभागाचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत.३‘लोकमत’ने ५ जुलै रोजी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतरही स्थानिक आमदारांसह नगरसेवकांनी कास्टिंग यार्डबाबत चुप्पी साधल्याने प्रस्तावित आरक्षणांची सध्या काय स्थिती आहे, याचा शोध घेतला असता अतिशय धक्कादायक बाबी उघडकीस आल्या.४शासनाच्या रेकॉर्डवर कोपरीतील सर्व्हे क्रमांक ८६ वर खाजण जमीन दर्शवण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात त्याठिकाणी प्रचंड नागरी वस्ती आहे. आजघडीला याविभागात दीड ते पावणेदोन लाखांची नागरी वस्ती आहे. असाच प्रकार घोडबंदरपट्ट्यातील कावेसर येथील सर्व्हे क्रमांक ३११ ते ३१३ च्याबाबतीत आहे. त्याठिकाणी उत्तुंग टॉवर्ससह दाट नागरी वस्ती आहे. उद्या कास्टिंग यार्ड करावयाचे झाल्यास जमीन संपादनासाठी ही सर्व हजारो बांधकामे तोडून लाखो रहिवाशांना विस्थापित करावे लागणार आहे.