ठाणे : ठाणे शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने हॉस्पिटलमधील बेड आता अपुरे पडू लागले आहेत. यामुळे ठाणे महापालिकेकडून ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे एक हजार बेडच्या रुग्णालयाचे काम सुरू असताना आता वागळे इस्टेट भागात एका खाजगी कंपनीच्या जागेवर म्हाडा आणखी एक हजार बेडचे रुग्णालय उभारणार असल्याची माहिती शनिवारी राज्याचे गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. याशिवाय, मुंब्रा आणि कळवा येथेही प्रत्येकी ५०० बेडच्या हॉस्पिटलसाठी जागेचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाण्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १८०० च्या घरात गेली आहे. शहरातील पाच खाजगी रुग्णालयांतील बेड आरक्षित ठेवले आहेत. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातदेखील कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव आता झोपडपट्टीत अधिक होऊ लागला आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही, रुग्णांची संख्या कमी होत नाही.
येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असल्याने त्या काळात रुग्णांचे अधिक हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नवीन तात्पुरत्या स्वरूपातील रुग्णालये सुरू करण्यासाठी शनिवारी आव्हाड यांच्या निवासस्थानी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी म्हाडाच्या वतीने वागळे इस्टेट भागात एका कंपनीच्या गोदामाच्या ठिकाणी एक हजार बेडचे रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचे नियोजन आता युद्धपातळीवर सुरू आहे.
कळव्यात जागा मिळेना
दुसरीकडे कळवा, मुंब्रा भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. परंतु, मुंब्य्रात एकच रुग्णालय असल्याने उर्वरित रुग्णांना ठाण्याच्या दिशेने धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे रुग्णांना त्यांच्याच भागात उपचार मिळाल्यास ते सोयीचे ठरणार आहे.त्या अनुषंगाने आता मुंब्य्रात एका शाळेत 500 बेडचे रुग्णालय उभारण्याचे यावेळी निश्चित केले आहे. तसेच कळव्यातही ५०० बेडचे रुग्णालय सुरू करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, या ठिकाणी जागेचा अभाव आहे. मैदानाचा विचार सुरू होता. परंतु, पावसाळ्यात रुग्णांचे तेथे हाल होऊ शकतात. त्यामुळे कळव्यात इतर कुठे जागा मिळते का? याचा शोध सुरू असल्याचीही माहिती आव्हाड यांनी दिली.