मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने काही कोटी खर्चून विकसित केलेल्या रामदेव पार्कमधील रामभाऊ म्हाळगी उद्यानाची अवघ्या दोन वर्षांतच दुरवस्था झाली आहे. उद्यानाचे श्रेय लाटण्यासाठी पालिका निवडणुकीआधी परस्पर उद्घाटनाचा खटाटोप करणाऱ्या राजकीय नेत्यांनी निवडणुकीनंतर उद्यानाकडे पाहिले नसल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे महापौरांच्या प्रभागातील उद्यान आहे.
पालिका निवडणुकीपूर्वी रामदेव पार्कमधील आरक्षणात काही कोटी रुपये खर्चून उद्यान विकसित करण्यात आले होते. मोठा गाजावाजा करत राजकीय श्रेय घेण्यासाठी परस्पर बेकायदा उद्घाटन केले होते. म्हाळगी उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, ओपन जिम, योगा करण्यासाठी शेड, मासे-कासव आदींकरिता तलाव, पिण्याच्या पाण्यासाठी कूलर, स्वच्छतागृह, गवत, बसण्यास बाकडे आदी सुविधा दिल्या होत्या.
महापालिका प्रशासनासह स्थानिक नगरसेवकांकडून मात्र उद्यानाच्या देखभालीकडे डोळेझाक झाल्याने दुरवस्था सुरू झाली आहे. आतील बहुतांश गवत सुकून गेले आहे. चालण्यासाठी बनवलेल्या जॉगर्स ट्रॅकच्या लाद्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे निखळल्या आहेत. त्यामुळे चालताना होणारा त्रास पाहता नागरिकांनी चालणे कमी केले आहे. उद्यानात कचरा वाढला असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. लावलेली रोपे सुकून गेली आहेत. झाडांनाही पाणी नियमित दिले जात नाही. तलावातील पाणी बदलणे व त्याचे शुद्धीकरण केले जात नसल्याने दुर्गंधी पसरण्याबरोबर मासे मरू लागले आहेत.महापौर डिम्पल मेहता यांच्या प्रभागातील हे उद्यान असून आठ महिन्यांपासून पालिकेकडे उद्यानातील दुरवस्थेबाबत तक्रार केली आहे. महापौरांसह गटनेता असे एकूण चार स्थानिक भाजप नगरसेवकांचेही लक्ष नही. महापालिकेने नागरिकांच्या करातून विकसित केलेल्या या उद्यानाच्या दुरवस्थेमुळे कोट्यवधी वाया गेले आहेत. त्याला जबाबदार कोण? श्रेय घेण्यासाठी चमकोगिरी करणारे नगरसेवक व त्यांचे नेते आता कुठे आहेत?- निलेश साहू , तक्र ारदार