ठाणे : ठाण्याच्या विविध ठिकाणी बुधवारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाचे बॅनर झळकले. पण या बॅनरवर जिल्हाप्रमुख (ठाणे लोकसभा) नरेश म्हस्के यांना मात्र जागा देण्यात आलेली नसल्याने ठाण्यातील राजकीय वर्तुळात नाना तºहेच्या चर्चा रंगल्या आहेत. कदाचित, स्मशानभूमीच्या वादावर अद्याप पडदा पडला नसल्यानेच म्हस्के हे सरनाईकांच्या बॅनरवरून हद्दपार झाले की काय, अशी चर्चा मात्र दिवसभर शिवसेनेत रंगली होती.गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या या दोन नेत्यांमध्ये स्मशानभूमीच्या मुद्यावरून वादंग निर्माण झाले आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या वादावर पडदा पडल्याचे या दोन्ही नेत्यांंनी स्पष्ट केले होते. असे जरी असले तरीदेखील महासभेत परिषा सरनाईक यांनी मात्र म्हस्के यांना या विषयावरून शाब्दिक चिमटा काढल्याने त्यांचा बांध फुटला आणि त्यांनी प्रताप सरनाईक यांचा थेट नामोल्लेख टाळून अनेक आरोप केले होते. त्याला नंतर सरनाईक यांनीही त्याचपद्धतीने उत्तर दिले. यामुळेच कदाचित सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरून म्हस्के गैरहजर असल्याचे दिसत आहे. वास्तविक पाहता म्हस्के हे जिल्हाप्रमुख असल्याने पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार त्यांचा फोटो असणे अपेक्षित होते. परंतु, इतर भरपूर नेत्यांचे फोटो बॅनरवर झळकत असताना त्यांना का डावलण्यात आले, याचीच चर्चा दिवसभर शिवसैनिकांत सुरू होती.
सरनाईकांच्या बॅनरवर म्हस्के गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 3:12 AM