ठाणे : महापालिकेत आमची एक हाती सत्ता आहे. पूर्ण बहुमत आहे, त्यामुळे अशी आंदोलनं करायची असतील तर आम्हाला तुमची गरज नसल्याचा टोला मंगळवारी महापौर नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांना लगावला होता. महापौरांच्या या वक्तव्यावर पलटवार करताना माजी खासदार तथा राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीमुळेच ते बिनविरोध महापौर झाल्याचे स्मरण करून दिले.
आनंद परांजपे यांनी सांगितले की, विस्मृती ही देवाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्याचे महापौर! ज्यावेळी महापौरपदाची निवडणूक झाली, त्यावेळी शिवसेनेचे नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांना फोन करून शिवसेनेचा महापौर बिनविरोध व्हावा, अशी विनंती केली होती. त्यानंतर १७ नोव्हेंबर २०१९ रोजी एकनाथ शिंदे आणि उमेदवार म्हणून नरेश म्हस्के हे तत्कालीन विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या दालनात आले. त्यावेळी गटनेते नजीब मुल्ला आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकदेखील उपस्थित होते. त्यावेळी शिंदे आणि म्हस्के यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे; त्यामुळे ठाण्यातही महापौरपदाची निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती केली. त्यावेळी राष्ट्रवादीने मोठ्या दिलाने निवडणुकीतून माघार घेत शिवसेनेला महापौरपद बिनविरोध दिले. राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करीत असतानाही राष्ट्रवादीने ठाण्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. त्यावर परांजपे म्हणाले की, ठामपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. शिवसेनेच्या राजवटीत जी काही अनागोंदी चालली आहे, त्याची पोलखोल महासभा आणि ठाणेकरांसमोर करावी लागणारच आहे. कोविडच्या काळात ठामपा प्रशासनाकडून अनागोंदी कारभार करण्यात आला. शिवसेनेचा त्यांच्यावर वचक नव्हता. सत्ताधारी शिवसेना दुटप्पी भावनेने वागत आहे; लसीकरण, विकासनिधीमध्ये सेनेकडून राजकारण केले जात आहे. याचा आक्रोश कधी ना कधी होणारच होता. कालच्या महासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे बोलणे सुरू असताना सचिवांकडून महापौरांच्या इशाऱ्यावरून आवाज म्यूट केले गेले. म्हणून त्यांचा आवाज महासभेपर्यंत पोहोचावा, यासाठी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक घुसले होते. महापौरांनी विकासनिधी रोखला होता, यासाठीही हे आंदोलन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परिवहनची आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना परिवहनची पाच कोटींची एफडी तोडून ठेकेदाराला बिले देण्यात आली, असा अनागोंदी कारभार आयुक्त डॉ. विपीन शर्मा करीत असल्याचा आरोप परांजपे यांनी केला.