कल्याण : केडीएमसीच्या भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी २४ जुलैला आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता, परंतु हा राजीनामा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मंगळवारी फेटाळला. म्हात्रे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर महापौर या नात्याने आयुक्त पी. वेलरासू यांच्याशी चर्चा झाली आहे. मी स्वत: म्हात्रे यांचे प्रश्न सोडवणार असल्याचे सांगत राजीनामा नामंजूर केल्याचे परिपत्रक त्यांनी जारी केले.फेरीवाला अतिक्रमण, पाणीचोरी, अन्यायकारक वसुली, अधिकाºयांची लाचखोरी, टॉवर आणि इमारती यांना कर लावण्यात होत असलेली टाळाटाळ, त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत म्हात्रे यांनी राजीनामा दिला होता. मात्र, तो उशिरा महापौर आणि आयुक्त कार्यालयांना मिळाला.दुसरीकडे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सोमवारी केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या नागरी सुविधा केंद्रात म्हात्रे यांच्या राजीनाम्याची छायांकित प्रत सादर करत तत्काळ राजीनामा मंजूर करण्याचे विनंती पत्र सादर केले होते. तर मनसेचे गटनेते प्रकाश भोईर यांनी म्हात्रेंचा राजीनामा म्हणजे हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे म्हंटले होते. याआधीही म्हात्रे यांनी असे अनेकदा राजीनामा दिले, परंतु ते मंजूर झाले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.
महापौरांनी फेटाळला म्हात्रे यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:12 AM