ठाणे - एमआयडीसी, स्टेम यांनी १४ टक्के पाणी कपात लागू केल्यानंतर आता भातसावरुन उचलण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर सुध्दा दरदिवशी १० टक्के कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे शहराची पाणी कपात वाढणार आहे. परंतु यावर उपाय म्हणून महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने लघु पाटबंधारे विभागाला पत्र लिहून दरदिवशी ही कपात करण्याऐवजी आठवड्यातून एकदाच २४ तासांचे शटडाऊन करु असे कळविले आहे. त्यानुसार या विभागाने सुध्दा महापालिकेची ही मागणी तुर्तास मान्य केली आहे. त्यामुळे मध्यवर्ती ठाण्यातील नागरीकांना रोजच्या रोज पाणी कपातीचा सामना करावा लागणार नसून आठवड्यातून एकदा २४ तासांच्या कपातीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे एकप्रकारे ठाणेकरांना दिलासा देण्याचे काम पालिकेने केले आहे. ठाणे शहराला ४८० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा हा विविध स्त्रोतांच्या माध्यमातून केला जात आहे. त्यानुसार एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठ्यात १४ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यानुसार यामुळे कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात आठवड्यातून एकदा म्हणजेच गुरुवारी रात्री ९ ते शुक्रवारी रात्री ९ वाजेपर्यंत पाणी कपात केली जात होती. तर स्टेमकडून होणाºया पाणी पुरवठ्यातही १४ टक्के कपात करण्यात आल्याने महापालिकेने याचेसुध्दा नियोजन दोन टप्यात केले होते. त्यानुसार शहरातील अर्ध्या भागाला १२ तास आणि उर्वरीत भागाला १२ तास असे पाणी कपातीचे नियोजन केले होते. परंतु आता भातसानेसुध्दा रोज १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या आशयाचे पत्र पालिकेला प्राप्त झाले आहे. त्यामुळे मध्यवर्ती आणि उर्वरीत ठाण्याला याचा फटका बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. महापालिका सध्या भातसावरुन २०० दशलक्ष लीटर पाणी उचलत आहे. त्यामुळे रोज १० टक्के या प्रमाणे ठाणेकरांना २० दशलक्ष लीटर कमी पाणी मिळणार होते. भातसाने घेतलेल्या या निर्णयामुळे ठाणेकरांना रोज पाणी कपातीचा सामना करावा लागणार होता. त्यामुळे कदाचित अनेक भागांना या पाणी कपातीचा तीव्र सामना करावा लागण्याची शक्यताही होती. आता मात्र पालिकेने या संदर्भात लघु पाटबंधारे विभागाला पत्र लिहिले आहे. तसेच मंगळवारी या संदर्भात पालिका आणि विभागाच्या अधिकाºयांमध्ये चर्चा झाली आहे. या चर्चेच्या अनुषंगाने रोजच्या रोज १० टक्के पाणी कपात न करता, आठवड्यातून एकदा २४ तासांची कपात घेऊ असे पालिकेने संबधींत विभागाला सांगितले आहे. त्यामुळे ठाणेकरांचे होणारे हाल कमी होणार असून आठवड्यातून एकदाच २४ तासांची कपात घेतली जाणार आहे. याशिवाय २४ तासांची ही कपात घेत असतांना दुसरीकडे सध्या होणाºया २०० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा हा १० दशलक्ष लीटरने वाढवून मिळावा अशी मागणीसुध्दा केली आहे. त्यामुळे आठवड्याचे सहा दिवस ठाणेकरांना थोडा का होईना जास्तीचा पाणीपुरवठा होणार आहे. पालिकेने उचललेल्या या पावलामुळे ठाणेकरांना कपातीचे चटके कमी प्रमाणात सहन करावा लागणार आहे.
- यापुढे या भागात होणार २४ तासाची पाणी कपात
ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्याटप्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये बुधवारी सकाळी ९ पासून रात्री ९ पर्यंत शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, गांधीनगर आदी परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर या परिसराचा पाणी पुरवठा बुधवारी रात्री ९ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार होता. परंतु आता पालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे या दोनही भागांचा पाणीपुरवठा यापुढे बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ असा सलग २४ तास बंद राहणार आहे.
- एमआयडीसीची १४ टक्के पाणी कपात
एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठ्यातही १४ टक्के कपात लागू करण्यात आल्याने गुरुवारी रात्री ९ ते शुक्रवारी रात्री ९ या कालावधीत २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार या कालावधीत शहरातील कळव्याचा काही भाग, विटावा, मुंब्रा कौसा, डायघर, देसाई इंदिरानगर, रूपादेवीपाडा, वागळे, फायरब्रिगेड, बाळकूम पाडा क्र .१ आदी भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.