मीरारोड - मीरा भाईंदर शहराला होणारा एमआयडीसी चा पाणी पुरवठा शुक्रवारी २८ जून रोजी २४ तासांसाठी दुरुस्तीच्या कामा मुळे बंद राहणार आहे. मीरा भाईंदर शहरास स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्याकरीता २४ तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे.
त्यामुळे गुरुवार दि. २७ जून रोजी रात्री १२ वा. ते शुक्रवार दि. २८ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यत असा २४ तासांसाठी एम.आय.डी.सी. प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. ह्या दरम्यान स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.
परंतु एम.आय.डी.सी. प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा पुर्ववत होईपर्यत मीरा-भाईंदर शहरास पाणी पुरवठा कमी दाबाने व उशीराने होणार आहे. त्यामुळे नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी केले आहे . तर २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना त्या नंतर देखील दोन ते तीन दिवस पाणी टंचाई सहन करावी लागणार आहे.