डोंबिवली : सार्वजनिक ठिकाणी बेकायदा बांधण्यात आलेल्या मंदिरे वा प्रार्थना स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच सर्वोच्य न्यायालयाने दिलेले आहेत .त्या आदेशाचे तंतोतंत पालन करून त्याचा अहवाल देण्याचे आदेश राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि संबंधित प्राधिकरणाला दिले होते. त्यानुसार गुरुवारी डोंबिवली एमआयडीसीने सागाव येथील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या शनी मंदिरावर कारवाई केली .सागाव येथील एमआयडीसीच्या जागेवर हे मंदिर सुमारे ८ – १० वर्षांपूर्वी उभारण्यात आले होते. हे मंदिर अल्पावधीतच प्रती शनिशिंगणापूर म्हणून ओळखले जाऊ लागले होते. शनिशिंगणापूरमध्ये ज्याप्रमाणे विधी केले जातात ,त्याप्रमाणे या मंदिरात विविध प्रकारचे विधी केले जात होते .त्यामुळे या मंदिरात मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी होत असे .मात्र हे मंदिर अनधिकृत असल्याने एमआयडीसीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते .या मंदिरावर कारवाई केली जाणार याबाबतची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती .सकाळी ११ च्या सुमारास प्रचंड पोलीस बंदोबस्तात एमआयडीसीने मंदिरावर कारवाई सुरु केली, त्यानंतर संध्याकाळपर्यंत ते काम सुरू होते. त्यावेळी काही लोकांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला .मात्र पोलिसांनी त्यांचा विरोध मोडीत काढून कारवाई पूर्ण केल्याची माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांनी दिली. शनी मंदिराची शिळा मात्र कायम ठेवली आहे.
शनी मंदिराच्या आवारातील अनधिकृत बांधकामावर एमआयडीसीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 8:31 PM