अंबरनाथ : तालुक्यातील नेवाळी नाका परिसरात एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने पुन्हा एकदा हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. शनिवारी पहाटे काटई नाका येथे देखील मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले होते. एकाच दिवशी दोन पाईपलाईन फुटल्याने आता ग्रामीण भागात देखील पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी शनिवारी पहाटे फुटल्यानंतर त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच नेवाळी फाटा परिसरात पुन्हा एकदा जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीतूनच ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी जी जलवाहिनी टाकण्यात आली होती ती जलवाहिनी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फुटली. एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने या जलवाहिनीच्या ही दुरुस्तीचे काम हाती घेतले असून अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागाला पुढचे दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.