ठाणे : दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर ठप्प असलेला मध्यरेल्वेचा टिटवाळा-कसारा मार्ग तब्बल ३७ तासांनी बुधवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास खुला झाला. तेथून कसा-याच्या दिशेने लोकल सोडून त्याची सुरक्षा चाचणी घेण्यात आली. सध्या कसा-याच्या दिशेने एकेरी मार्ग सुरू करण्यात आला आहे.मुंबईच्या दिशेने येणारी दुरांतो एक्स्प्रेस मंगळवारी सकाळी घसरल्याने हा मार्ग बंद होता. दिवसभरात डबे हटवण्याचे आणि नंतर रूळ टाकण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले. त्यानंतर ओव्हरहेड वायरचे काम पूर्ण झाले. वीजप्रवाहाची चाचणी घेऊन सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास लोकल सोडण्यात आली. रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी दोन दिवस तेथे तळ ठोकला असून जवळपास ३५० कामगार तेथे अहोरात्र काम करीत आहेत. आताही लोकल वाहतूक सुरू झाली असली, तरी अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी तेथून मोजक्याच फेºया होतील. नंतर त्या टप्प्याटप्प्याने वाढवत नेल्या जातील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.कल्याण ते कर्जत आणि कसारादरम्यान कोणतीही समस्या उद््भवली तरी अधिकारी पोचून ती मार्गी लागेपर्यंत खूप वेळ जातो. त्यामुळे रेल्वेच्या उपविभागीय महाव्यवस्थापकांचे कार्यालय कल्याणला हलवावे. त्यामुळे प्रश्न लवकर सुटतील, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली.
पुन्हा दरड कोसळलीपावसाच्या संततधारेने कसारा घाटात नाशिकच्या दिशेने जाणाºया मार्गात दरडी व झाडे कोसळल्याने बुधवारी सकाळी रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. जुन्या कसारा घाटात अंबा पॉईंट वळणावर सकाळी महाकाय वृक्ष व दरडी कोसळल्या. यात दोन बाइकस्वार थोडक्यात बचावले. मात्र अन्य कोणतीही हानी झाली नाही. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर दरडी हटविण्यात आल्या. हे काम सुरू असेपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी संबंधित ठेकेदार कंपनी आणि नॅशनल हाय वे अॅथॉरिटीला नोटीस बजावली आहे.रूळांखालील माती खचल्याने दुरांतोला अपघात झाल्याने वाहतूक सुरू करण्यापूर्वी पुन्हा जमिनीची तपासणी करण्यात आली. आधी कसाºयाला जाणारी एकेरी वाहतूक सुरू होईल. नंतर दुसरा मार्ग सुरू होईल. त्यावरून ताशी ३० किमीच्या वेगाने वाहतूक सुरू राहील. लोकल वाहतूक नीट सुरू झाल्यावरच लांबपल्ल्याच्या गाड्या धावतील.अनेक गाड्या रद्ददुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे बुधवारी दुसºया दिवशीही मुंबई-वाराणसी महानगरी, मुंबई-अमृतसर पठाणकोट, राजेंद्रनगर, मुंबई-नांदेड, मुंबई मनमाड, मुंबई-मनमाड, एलटीटी-मनमाड, मुंबई-नागपूर, मुंबई-नागपूर, मनमाड-मुंबई, मनमाड-मुंबई, मनमाड-एलटीटी, एलटीटी-गोहाटी, एलटीटी-गोरखपूर, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, मुंबई-हावडा गीतांजली, एलटीटी-कामाख्या, वाराणसी-एलटीटी, एलटीटी-वाराणसी, मुंबई-नांदेड, शालिमार एक्स्प्रेस, शालिमार, हावडा-मुंबई मेल, मुंबई-हावडा मेल या गाड्या रद्द करण्यात आल्या.मार्ग बदललेविदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई, एलटीटी-पुरी, एलटीटी-राजेंद्रनगर, एलटीटी-दरभंगावेळेत बदल : पवन, काशी, गोदान, मुंबई-हावडा, पुरी-एलटीटी, भुसावळ-पुणे हुतात्मा ही गाडी मनमाड-दौंडमार्गे धावेल. मंगला एक्स्प्रेसही जळगाव,बोईसर मार्गे धावणार आहे.