ठाणे : कामानिमित्त गाव सोडून अन्यत्र स्थलांतरित होणाऱ्या बालकांच्या लाभार्थी कुटुंबीयांना आता ‘पोषणकार्ड’ वाटप केले जाणार आहे. त्याद्वारे त्यांना स्थलांतरित झालेल्या गावात अंगणवाडी केंद्राद्वारे दिल्या जाणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात २० हजार कार्डचे वाटप करण्याचे नियोजन ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने केले आहे.
कामाच्या शोधात दुसऱ्या जिल्ह्यात, तालुक्यात स्थलांतरित हाेणाऱ्या कुटुंबांच्या लाभात खंड पडू नये, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी स्थलांतरित कुटुंबांना या कार्डचे वाटप हाेणार आहे. जिल्ह्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे नऊ प्रकल्प सुरू आहेत. त्यामध्ये एक हजार ९९४ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांच्या क्षेत्रातील स्थलांतरित लाभार्थी कुटुंबीयांची संख्या विचारात घेता प्रतिअंगणवाडी कमीतकमी १० षोषणकार्डचे नियोजन केले आहे. वीटभट्टी स्थलांतरित होणारे सात हजार ७६९ कुटुंबे प्रामुख्याने भिवंडी, अंबरनाथ, कल्याण, शहापूर, मुरबाड तालुक्यांत आहेत. त्यानुसार २० हजार पोषणकार्ड छपाईचे नियोजन केले आहे. यामध्ये हिरव्या रंगाच्या पोषणकार्डमध्ये लाभार्थ्यांच्या मूळ ठिकाणच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. यात लाभार्थ्यांची आरोग्यतपासणी, वजन, उंची आदी नोंद घेतली जाईल. गुलाबी पोषणकार्डमध्ये लाभार्थ्यांच्या स्थलांतरित ठिकाणच्या नोंदी घेण्यात येणार आहेत.