- श्याम धुमाळ कसारा : भिवंडी (वडपा) येथील एका गोदामात कामाला असणाऱ्या कामगारांना तेथील व्यवस्थापनाने गोदाम बंद असल्यामुळे हाकलवून लावले. यामुळे बुधवारी दुपारी उत्तर प्रदेशातील आपल्या गावी पायी निघालेले चार मजूर कसारा घाटातील दरीत अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनास तब्बल ८ तास अथक परिश्रम घ्यावे लागले. गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास त्यांची सुखरुप सुटका केली.लॉकडाउनमुळे अनेक परप्रांतीय मजूर मुंबई, ठाणे, कल्याणसह विविध ठिकाणाहून पायी गावाला निघाले आहेत. अनेक मजुरांची प्रशासनाने सोय केल्यानंतरही या मजुरांना त्यांचे घरमालक, कंपनीतील कंत्राटदार यांनी हाकलल्यामुळे दररोज मोठ्या संख्येने कामगार पायी जात आहेत. रस्त्यावर पोलीस असल्याने काही जण डोंगर, दरीतून पायवाट काढत प्रवास करीत आहेत. असाच प्रवास भिवंडीतील गोदामात कामाला असणारे नरेंद्र चौधरी, भूपाल निसार, राजेश कोल आणि फुलचंद रावत हे करत होते. त्यांनी महामार्गावर लतीफवाडी व कसारा घाट माथ्यावर पोलिसांचे चेक पोस्ट असल्याने त्यांनी मुंबई- नाशिक महामार्गावरील चिंतामणवाडी येथून डोंगरातून जाण्याचा मार्ग अवलंबला. १२ ते १३ किलोमीटर चालल्यानंतर ते बुधवारी दुपारी जंगलात भरकटले. १६०० फूट खोल व घनदाट झाडी असलेल्या दरीतून वाट काढण्याच्या प्रयत्नात रात्र झाली, पण रस्ता काही सापडत नव्हता. यातील एकाने १०० नंबरवर फोन करून पोलिसांकडे मदत मागितली, तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते. त्यानंतर कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तू भोये, पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन टीमने डोंगर परिसरात शोध घेतला. त्यांचे मोबाईल ट्रॅक करून लोकेशन काढले असता ते उंटदरीत अडकल्याचा अंदाज व्यक्त केला. अडकलेल्यांपैकी एकाशी मोबाइलवर संभाषण सुरु होते, ‘साहब हमें बचाव’ असे ओरडत होते. घाटनदेवी मंदिरासमोरील एका टेकडीवरून दरीत मोबाईल लाइट दिसला. यानंतर पोलीस कर्मचारी रामदास राठोड व आपत्ती व्यवस्थापन टीममधील लक्ष्मण वाघ व काही सदस्य सावरवाडी (कसारा खुर्द ) येथून उतरले तर कसारा घाट घाटनदेवी मंदिराकडून काही जण मदतीसाठी उतरले असता ८ तासानंतर ते सापडले.चौघांना दिले पोलिसांच्या ताब्यात१६०० फूट खोल दरीत अडकलेल्या मजुरांना टीमने वर आणल्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या मोहिमेत आपत्ती व्यवस्थापन टीमचे श्याम धुमाळ, दत्ता वाताडे, अक्षय राठोड, प्रथमेश पुरोहित, रवी देहाडे, मयूर गुप्ता व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
१६00 फूट खोल दरीतून वाचवले परप्रांतीय कामगारांना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 12:32 AM