जव्हार : जव्हार तालुक्यामध्ये पावसाळी हंगामी कामे संपल्यानंतर येथील मजुरांच्या हाताला कोणतेही काम नसते. या ग्रामीण भागात कंपन्या व औद्योगिक क्षेत्र नसल्याने येथील बेरोजगार मजुरांना कोणतेही काम मिळत नाही. त्यामुळे रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागत आहे. जव्हार तालुक्यातील कासटवाडी ग्रामपंचायत हद्दीतील हाडे गावठाण, देवीचापाडा, धूमपाडा व गणेशनगर या गावपाड्यांतील जॉबकार्डधारकांनी तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रोहयो कामाची मागणी करूनही काम मिळाले नाही. कासटवाडी ग्रामपंचायतीमध्ये ५९६ जॉबकार्डधारक कुटुंबांची संख्या असून यामध्ये १ हजार ७७८ रोहयो मजूर आहेत. या मजुरांनी जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन तीन महिन्यांपूर्वी जव्हार तहसीलदार रोहयो विभागाकडे ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामाच्या मागणीचा अर्ज केला होता. मात्र, अजूनही काम उपलब्ध करून देण्यास यंत्रणा निकामी ठरली आहे. रोजगार हमीच्या कामांची मागणी मजुरांनी केल्यानंतर संबंधित कामावर लागणाऱ्या मजुरांचे ई-मस्टर काढून त्यांना १५ दिवसांच्या आत काम देणे बंधनकारक असते. परंतु, जव्हार तहसीलदार व त्यांची रोजगार हमी यंत्रणा यांच्या बेजबाबदारपणामुळे कासटवाडी गावातील मजुरांना काम मिळाले नाही. परिणामी, येथील रोहयो मजुरांना ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, रेतीबंदर, वीटभट्टी, बांधकाम अशी बिगारी कामे करण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागत आहे.
रोजगाराअभावी जव्हारमध्ये स्थलांतर
By admin | Published: March 14, 2016 1:34 AM