लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील खुनी, चोर, ड्रग्जमाफिया आपल्या मानेभोवती पोलिसांचा पोलादी हात पडेल या कल्पनेने वचकून असतात. मात्र, रविवारी ‘लोकमत’ साहित्य महोत्सवातील ‘वर्दीतील दर्दी’ या कार्यक्रमात याच पोलादी हातात लोकमत माईक सोपविणार आहे अन् त्यानंतर तुमच्या कानावर पडणार आहे, ‘ये जमीं गा रही हैं, आसमाँ गा रहा हैं साथ मेरे ये सारा जहां गा रहा हैं...’
महापालिकेचे कर्मचारी असो, की पोलिस सेवेतील. जिल्हा परिषदेचे अधिकारी असो, की जिल्हाधिकारी कार्यालयाचे. साऱ्यांवरच वेळेवर पंचिंगपासून कार्यालयीन शिस्तीची अनेक बंधने असतात. प्रोटोकॉल, सीआर अशा असंख्य बाबींचे अवडंबर असते. मात्र, दिवसभर ड्युटी केल्यानंतर कामाच्या ताणातून मुक्त होण्याकरिता कुणी बासरीवादन करीत असतो, तर कुणी तबलावादन. कुणी शास्त्रीय संगीत शिकतो, तर कुणी कथ्थक. मात्र आपले कलागुण सादर करण्याची संधी अनेकांना फारच क्वचित मिळते. यूट्युब किंवा इन्स्टाग्रामवर रिलबिल पोस्ट केले तर त्यातही धोका. मात्र, लोकमतने वर्दीमधील कलाकारांना साहित्य महोत्सवाच्या निमित्ताने आपले कलागुण सादर करण्याची संधी उपलब्ध केली आहे.
कोरम मॉलमध्ये रविवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळात आयोजित या कार्यक्रमात बहारदार गाणी, कविता पोलिस, महापालिका, जिल्हा परिषद कर्मचारी अधिकारी सादर करणार आहेत. मराठी साहित्याचा जागर असल्याने ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना’, ‘प्रथम तुला वंदितो’ या व अशा सुश्राव्य मराठी गीतांनी कानसेन तृप्त होतील. बासरी व तबला यांची जुगलबंदी असा दुग्धशर्करा योग लाभणार आहे.
हे अधिकारी, कर्मचारी घेणार भागसहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव, पोलिस उपायुक्त रूपाली अंबुरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली धाटे, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, सहायक पोलिस आयुक्त गजानन काब्दुले, सहायक पोलिस आयुक्त अनिल देशमुख, पोलिस निरीक्षक वैशाली रासकर, जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक संदेश म्हस्के, कनिष्ठ सहायक प्रशांत धनगर, खर्डीचे तलाठी योगेश भोई, महापालिका कर्मचारी दत्तात्रय मानमोडे, शिवराम टक्के, गुरुनाथ पाटील.