--------------------------------------------
दोन गटांत हाणामारी
डोंबिवली : रविवारी होळीच्या दिवशी रात्री १२.३० वाजता दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना पश्चिमेकडील नवापाडा गावदेवी मंदिर येथील सार्वजनिक होळीच्या ठिकाणी घडली. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून १० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. धक्काबुक्की, शिवीगाळ, चाकूसारख्या टोकदार वस्तूने वार असे प्रकार या हाणामारीच्या घटनेत घडले आहेत.
--------------------
रक्तदान शिबिर
कल्याण : कोरोना समुपदेशन समितीच्या विद्यमाने १८ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर, विनामूल्य अँटिबॉडी टेस्ट शिबिर, प्लाझ्मा नोंदणी शिबिर आयोजित केले आहे. पश्चिमेकडील केडीएमसीच्या मुख्यालयासमोरील स्वामी नारायण हॉलमध्ये हा कार्यक्रम सकाळी १० ते संध्याकाळी ४ या कालावधीत होणार असल्याची माहिती समुपदेशन समितीचे अध्यक्ष अनिल काकडे यांनी दिली.
-----------------------------------------------
कारची दुचाकीला धडक
कल्याण : कृष्णा दीपक जगताप हा केक आणण्यासाठी दुचाकीवरून जात असताना त्याच्या दुचाकीला भरधाव कारची धडक बसली. ही घटना सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पश्चिमेकडील रामबाग रिक्षा स्टॅण्डसमोर घडली. या अपघातात कृष्णाच्या डोक्याला आणि छातीला मार लागला आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात कारचालक स्वराज तेली विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
------------------------------
मोबाइलची चोरी
कल्याण : सोनू गुप्ता हे सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील दीपक हॉटेलसमोर पॅसेंजर घेण्याकरिता आले असताना त्यांच्या गाडीतील मोबाइल चोरट्याने लांबविल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी गुप्ता यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
--------------------