लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : ऑक्सिजन आणि औषधांविना आई आणि मुलगी घरी असल्याची साेशल मीडियावरील पाेस्ट खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या नजरेत येताच त्यांनी अर्धा तासातच शिवसैनिकांमार्फत ऑक्सिजन आणि औषधांची साेय केल्याने या मायलेकींना जीवदान मिळाले आहे. त्यानंतर त्यांनी उपचारांचा खर्च देण्याचेही आश्वासन दिले. खासदारांच्या या तत्परतेचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं. ४ परिसरात ६५ वर्षीय निशा परमानंद पंजाबी यांना वृद्धत्व आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे बेडवरून उठता येत नाही, तर त्यांची ३५ वर्षीय मुलगी आरती पंजाबी हिच्या हृदयाला हाेल असल्याने तिला ऑक्सिजनची गरज हाेती. मात्र, घरात कोणीच नसल्याने त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. एका जागरूक नागरिकाने या मायलेकींचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांच्यासाठी मदतीची याचना केली. ही पाेस्ट खासदार शिंदे यांच्या वाचण्यात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता शिवसेनेचे उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान यांना संपर्क करून मुलीसाठी ऑक्सिजनचा बाटली आणि दाेघींच्या औषधांसह इतर साहित्य देण्याचे आदेश दिले. त्यानंतर अर्ध्या तासातच शिवसैनिक राहुल इंगळे यांच्यासाेबत इतरांनी वृद्धेच्या घरी जाऊन हे साहित्य पाेहाेचविले.
मदतीसाठी आणखी हात सरसावले
खासदार शिंदे यांची तत्परता आणि नगरसेवक अरुण अशान यांच्या प्रयत्नांमुळे या मायलेकींना आधार मिळून जीवदान मिळाले आहे. तसेच या मायलेकींच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची सूचनाही खासदारांनी शहर पदाधिकारी व शिवसैनिकांना दिल्या. खासदारांच्या मदतीमुळे अनेकांनी मदतीचा हात पुढे केल्याची माहितीही समाजसेवक शशिकांत दायमा यांनी दिली.