भिवंडी : शहर आणि परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अमूल दुधाच्या पिशव्यांचे कॅन चोरीचे प्रमाण वाढले होते. तीन महिन्यांपासून त्रस्त झालेल्या कंपनीच्या वितरकांनी कॅमेरा लावल्याने त्यामध्ये कैद झालेल्या दोन चोरांची पोलिसांनी चौकशी केली असता विक्रेताच टोळीचा म्होरक्या निघाल्याची माहिती नारपोली पोलिसांनी दिली.बद्रुजम्मा अब्दुल वसीम अन्सारी,आयाज गुड्डु खान या दोन चोरांसह विक्रेता अब्दुल चौधरी यालाही पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. अंजूरफाटा येथील मराठा पंजाब हॉटेलसमोर शब्बीर डेअरी या नावाने दूध विक्री व्यवसाय करणारा अख्तर हुसैन यांच्या डेअरीच्या ठिकाणाहून मागील तीन महिन्यांपासून पाच ते सात वेळा दूध चोरीच्या घटना घडल्या. या चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी विक्री व्यवसायाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावले. त्यामध्ये दूध चोरीची घटना कैद झाल्यावर सीसीटीव्हीची माहिती नारपोली पोलिसांना दिली. दरम्यान, पोलिसांसह दूध विक्रेते रात्रीची गस्त घालून दूध चोरी करणाºया चोरांच्या पाळतीवर होते.रविवारी पहाटे एका रिक्षातून दहा क्रेटमधून १२० लिटर दूध घेऊन जाताना पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी चौक येथील महेश कोकुलवार यांच्याकडून दूध आणल्याचे सांगून ते अंजूरफाटा खारबावरोड वरील दूध विक्रेता अब्दुल चौधरी यांच्या डेअरीवर घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यांच्या बोलण्यातून संशय बळावल्याने नारपोली पोलिसांनी बद्रुजम्मा अब्दुल वसीम अन्सारी, आयाज गुड्डु खान या दोघांसह दूध विक्रेता एजंट अब्दुल चौधरी यास नारपोली पोलिसांनी ताब्यात घेत निजामपूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. शहर व परिसरातील ग्रामीण भागात या कंपनीचे सुमारे ७५ हजार लिटर दूध उतरवले जाते. कंपनीच्या मुख्य वितकराकडून मध्यरात्रीनंतर दूध विक्री करणाºया एजंटांनी नेमून दिलेल्या ठिकाणावर नियमित दुधाचे क्रेट उतरवले जातात. परंतु दोन ते तीन महिन्यांपासून दूध कमी येत असल्याच्या तक्रारी मुख्य वितरकाकडे आल्याने त्यांनी सर्व माहिती घेतली असता वाहनचालक चोरी करत नसल्याचे समजले.एका क्रेटमध्ये असते १२ लीटर दूधएका क्रेटमध्ये १२ लिटर दूध असते. असे शहरातील विविध दूध विक्रेत्यांचे दहा ते वीस क्रेट चोरीस जात असल्याची तक्रार नारपोली पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती. तसेच दूध चोरी प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात महेश कोकुलवार यानेही आपल्याकडील ५ हजार २८० रूपयांच्या १२० दुधाच्या चोरीची फिर्याद दिली. त्यानुसार निजामपूर पोलिसांनी दूध विक्रेता अब्दुल चौधरी व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेत कोणकोणत्या ठिकाणी दूध चोरी केली याची माहिती घेणे सुरू केले आहे.
दूध चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश, भिवंडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 1:10 AM