लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : यंदा गणेशोत्सवाचा उत्साह प्रचंड दिसत आहे. मात्र, बाजारात महागाईची झळ सर्वत्र मिठाईलाही बसली असून तिचे दर प्रचंड वाढले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत मिठाईच्या प्रत्येक पदार्थाच्या किलोमागे १५० ते २०० रुपयांची वाढ विक्रेत्यांनी केली आहे. दूध, साखरेचे दर जैसे थे; मग मिठाईच महाग का? असा सवाल ठिकठिकाणी ग्राहक करताना दिसून येत आहेत. मिठाई महागली असली तरी हा चढा भाव देऊन ती ग्राहक खरेदी करत आहेत. त्यामुळे विक्रेते समाधानी दिसत आहेत.
शहरातील बहुतांशी १२५ लहान-मोठ्या व्यावसायिकांकडे मिठाई विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातही नामांकित असो वा नसो, पण वर्षानुवर्षे व्यवसायात असलेल्या मिठाई विक्रेत्यांकडून खरेदी होत असल्याने सर्वच व्यापारी गतवर्षीपेक्षा यंदा खूश असल्याचे आढळून आले. गणेशाेत्सव असल्याने ग्राहक मिठाई खरेदीवर अधिक भर देत आहेत. मात्र, ऐन गणेशाेत्सव काळात इंधनासह विविध जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींचा भडका उडाल्याने त्याची झळ सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला बसत आहे.
------------
मिठाई
पेढे : आधी ४५०- ५०० रुपये, आता ६०० ते ८०० रुपये
बर्फी : आधी ५५० किलो, आता ७००, ८०० किलो
--------------
का वाढले दर ?
महागाई वाढली आहे, तसेच मिठाईचे पदार्थ बनवण्यासाठी घ्यावे लागतात. त्यामुळे कल्याणहून दूध मागवावे लागते. रोजचा भाव वेगळा असतो. त्यासोबत ट्रान्सपोर्टचा खर्च डिझेल दरवाढीमुळे वाढला आहे. आधी कामगार सहज मिळायचा. मात्र, आता मिळत नसून त्यांनीही त्यांचा रोजंदारीचा भाव वाढवला आहे. या सगळ्यामुळे साहजिकच मिठाईचा भाव वाढवावा लागला. बाजारात सगळेच महागले आहे.
- श्रीपाद कुलकर्णी, मिठाई विक्रेते.
----------
अडीच वर्षांत यंदा मिठाईचे भाव काहीसे वाढले आहेत. शहरात सुमारे १२५ लहान-मोठे मिठाई विक्रेते आहेत. कोणी डिझेल, रॉकेल, गॅस भट्टी वापरतात, पण या सगळ्या इधनांचे भाव वाढले आहेत. साखर वाढलेली नसली तरी दुधाचे भाव वाढलेले आहेत. त्यातच लेबर हा मोठा प्रश्न होता. हळूहळू आता तो काहीसा मार्गी लागत आहे, पण त्यांचा रोजीचा रेट वाढला असल्याने साहजिकच मिठाईचे भाव वाढवण्याचा निर्णय व्यावसायिकांना घ्यावा लागला.
- सुभाष पाटील, मिठाई, दूध विक्रेते.
----------------
भाववाढ झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. सगळीकडे महागाई असल्याने इथेही भाववाढ अपेक्षितच होती. दरवर्षीपेक्षा यंदा दीडशे, दोनशे रुपयांनी मिठाई महागलेली आहे. खर्चाचा मेळ बसवताना नाकीनऊ येतात.
- मनोहर गचके, ज्येष्ठ नागरिक.
----------------