ठाणे : ठाण्याचे भूषण असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या १६ कोटी खर्चाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाने मागे घेतला असला तरी मागील पाच वर्षात गडकरी रंगायतच्या छोट्या मोठ्या दुरुस्तीच्या नावाखाली पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे एवढा खर्च झाला असताना पुन्हा १६ कोटी रुपयांचा खर्च कशाकरिता करायचा होता, असा सवाल उपस्थित झाला आहे.
ठाण्यातील दक्ष नागरीक संजीव दत्ता यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता. त्याला दिलेल्या उत्तरात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गेल्यावर्षी या नाट्यगृहाच्या छताच्या प्लॅस्टरचा भाग कोसळला होता. या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने नाट्यगृहाच्या बांधकामाचे संरचनात्मक परीक्षण केले होते. या परीक्षण अहवालातील सूचनांच्या आधारे प्रशासानाने नाट्यगृह दुरुस्तीचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव पालिकेने पुढे आणला होता. परंतु तो चर्चेला येण्यापूर्वीच हा प्रस्ताव मागे घेण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
गडकरीच्या दुरुस्तीवर वारंवार खर्च केल्याचे दिसत आहे. २००८ मध्ये सुरवातीला विद्युतीकरणाच्या काही किरकोळ कामांसाठी ७९ लाख ३७ हजार १८० रुपये खर्च झाला होता. त्यानंतर २०१२-१३ मध्ये ४८ लाख २९ हजार ४००, २०१३-१४ मध्ये १९ लाख ३ हजारांचा खर्च करण्यात आला. स्क्ट्रचरल आॅडीटसाठी २०१५ मध्ये २ लाख ९८ हजारांचा खर्च झाला तर रंगायतनाच्या बाहेरील बाजूच्या तीन पुतळ्यांची दुरुस्ती करण्यासाठी ६६ लाख ८० हजार, अग्निप्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी १९ लाख ९० हजार, अत्यावश्यक स्थापत्य कामे करण्यासाठी ९ लाख ९० हजार ३०० रुपये, छतामधून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी ९ लाख ११ हजार ४०० रुपये, रंगरंगोटीसाठी ९ लाख ३८ हजार, इतर कामासाठी ९ लाख ९९ हजार ८०० रुपये, छतावर तात्पुरती वेदर शेड टाकण्यासाठी २१ लाख ८० हजार १५५ रुपये, जिप्सम सिलिंग करणे व इतर कामांसाठी २० लाख ६१ हजार ५०० आणि पॉवर हाऊसचे वॉटर प्रुफींग करण्यासाठी ८ लाख १३ हजार ९०० रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत केलेल्या खर्चातून काय साध्य झाले व आता पुन्हा पैशाची उधळपट्टी कशासाठी असा सवाल दत्ता यांनी उपस्थित केला.पुनर्बांधणी हवीच्नाट्यगृहाच्या दुरु स्तीवर वारंवार पैसे खर्च होत असल्याचे सांगत अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेने नाट्यगृहाची पुनर्बांधणी करण्याची मागणी केली होती.