भिवंडी : ‘तौउते’ वादळाने कोकण पट्टीवरील भागात धूळधाण उडविली असताना खारबाव येथे चक्रीवादळ व जोरदार पडलेल्या अवकाळी पावसाने खारबाव येथील वीटभट्टी चालकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील खारबाव, अनगाव, अंबाडी, दिघाशी, पडघा या भागांत अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर वीटभट्टीचा व्यवसाय करतात. मागील वर्षभरापासून कोरोनाच्या संकटाने आधीच आर्थिक गर्तेत सापडलेल्या वीटभट्टी व्यावसायिकांचे ‘तौउते’ वादळामुळे आलेल्या संततधार पावसामुळे तयार व भट्टीमध्ये लावलेल्या लाखो विटांचे नुकसान झाले आहे.
खारबाव, मालोडी, पायगाव, पाये या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वीटभट्टी व्यवसाय फोफावला असून, येथील पंडित म्हात्रे, मंजित पाटील, किशोर पाटील, किरण पाटील, रवी पाटील, तुषार चौधरी, प्रशांत पाटील या वीटभट्टी मालकांचे सुमारे पाच ते सहा लाख कच्च्या मालाचे, तसेच वीटभट्टीवर रचलेल्या १० लाख कच्च्या मालाचे नुकसान झाले असल्याची माहिती उद्योजक पंडित म्हात्रे यांनी दिली. यामुळे शासनाने शेतीपूरक व्यवसाय म्हणून वीटभट्टी चालकांना सवलती व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.