उल्हासनगर : कॅम्प नं-४ परिसरातील एका पडक्या बरॅकमधील घरात एकटी राहणाऱ्या वृद्धेकडे सोन्याच्या दागिन्यासह ५०० रुपयांच्या जुन्या नोटांसह लाखो रुपयांचा ऐवज शुक्रवारी मिळाला. ही वृद्ध महिला आजारी असल्याने तिला रुग्णालयात भरती केल्यास घरी चोरी होण्याची भीती होती. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण ऐवज ताब्यात घेऊन वृद्धेला रुग्णालयात दाखल केले. तिच्या नातेवाईकांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरातील पडक्या बरॅकच्या घरात ८० वर्षांच्या कौशल्या वाधवा एकट्याच राहतात. त्यांची तब्येत बरोबर नसल्याची माहिती उल्हासनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश तेजवानी व समाजसेवक पप्पू पमनानी यांना मिळाली होती. मात्र त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेल्यास, घरी चोरी होण्याची भीती होती. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती सहायक आयुक्त डी. टी. टेळे व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांना दिली. त्यांनी तेजवानी यांच्यासोबत उपनिरीक्षक आर. आर. पाटील आणि दोन पोलीस हवालदार दिले. त्यांनी वृद्धेच्या सहमतीने घरातील कपाट उघडून त्यातील सर्व ऐवजाचा रीतसर पंचनामा केला.
वृद्धेच्या कपाटातून जुन्या ५०० रुपयांच्या एकूण ८५ हजार रुपयांच्या नोटा, तसेच १०० रुपयांच्या नोटांचे एक लहान बंडल मिळाले. याशिवाय सोन्याच्या बांगड्या, कुंडले, दोन बँकांमध्ये प्रत्येकी दाेन आणि एक लाख रुपये जमा, तसेच फिक्स डिपॉझिटमध्ये ८ लाख रुपये असल्याची कागदपत्रेही पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संपूर्ण ऐवज पंचनामा करून ताब्यात घेतला. त्यानंतर वृद्धेला रुग्णालयात दाखल केले. उपचार केल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले. तिचा संपूर्ण ऐवज वृद्ध महिला आणि तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. वृद्धेच्या पतीचे यापूर्वीच निधन झाले असून, त्यांना अपत्य नाही. गेल्या वर्षी मुंबईला राहणाऱ्या तिच्या पुतण्याचेही निधन झाले. या पुतण्याची पत्नी जिवंत असल्याची माहिती जगदीश तेजवानी यांनी दिली. तिची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.