लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पुण्यातील विश्रांतवाडीतील एका घडयाळाच्या दुकानातून लाखोंच्या घडयाळांची चोरी करुन झारखंडमध्ये पलायनाच्या तयारीतील शाहआलम शेख (५३, रा. साहेबगंज,झारखंड ) याच्यासह दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने अटक केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून चार लाख ४८ हजारांची २९० घडयाळेही जप्त केली आहेत.घरफोडीतील काही संशयित कल्याण रेल्वे स्थानकात येणार असल्याची टीप ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, संदीप चव्हाण, उपनिरीक्षक दिपेश किणी, हवालदार राजेंद्र सांबरे, भरत आरवंदेकर, हरीश तावडे, दिपक जाधव, अमोल देसाई, नंदकुमार पाटील आणि शब्बीर फरास आदींच्या पथकाने २० जानेवारी २०२२ रोजी कल्याण रेल्वे स्थानक येथून परराज्यात जाण्याच्या तयारीतील शाहआलम आणि रुंदल सिंग निरंजन सिंग (३०,रा. झारखंड) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्येटायटन कंपनीची ५२ मनगठी घडयाळे, फास्टट्रॅक कंपनीची २३ मनगटी घडयाळे, मॅक्सीमाची १०५ तर सोनाटाची ११० अशी चार लाख ४८ हजार ३५३ रुपयांची २९० घडयाळे हस्तगत केली. सखोल चौकशीमध्ये त्यांनी १८ जानेवारी रोजी पुण्यातील विश्रांतवाडीतील घडयाळाचे दुकान फोडून चोरी केल्याची कबूली दिली. हाच मुद्देमाल घेऊन ते त्यांच्या झारखंड राज्यातील मुळगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.* पुण्यात चोरीचा गुन्हा -ठाणे पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये १९ जानेवारी रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. या दोघांनीही विश्रांतवाडीतील धानोरीतील भैरवनगर येथे राजेश्वरी वॉच अॅण्ड आॅप्टीशियन या दुकानाच्या खिडकीचे गज रात्रीच्या वेळी कापून चोरी केल्याचे उघड झाले.* या दोघांवरही गुन्हे दाखल -शाहआलम याच्याविरुद्ध झारखंडमधील राधानगर, नवी मुंबईतील वाशी आणि ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर रुंदल सिंगविरुद्ध झारखंडमध्ये गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.