- हितेन नाईक
पालघर : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा मोठा फटका पालघर एसटी परिवहन विभागाला बसला असून १० आणि ११ एप्रिल रोजीच्या लॉकडाऊनच्या दोन दिवसातील ८२० एसटीच्या फेऱ्यांपैकी फक्त १७९ फेऱ्या मारण्यात एसटी विभागाला यश आले आहे. त्यामुळे २ लाख २८ हजार २९२ किलोमीटर्सद्वारे एसटी विभागाला ७५ लाख ३३ हजार ६३६ रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.पालघर एसटी परिवहन विभाग भाडेतत्त्वावर वाहने उपलब्ध करून हा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न करीत असताना पुन्हा वाढत्या कोरोनाचा फटका एसटी विभागाला बसत आहे. पालघर एसटी परिवहन विभागांतर्गत पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू, जव्हार, वसई, अर्नाळा, नालासोपारा असे एकूण ८ डेपो असून या डेपोतून दररोज एसटी बसच्या ३ हजार ३७४ फेऱ्यांसह १ लाख ४३ हजार किलोमीटर्सचा प्रवास केला जात असून यातून पालघर विभागाला सुमारे ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असते.पालघर आगारातून ६९२ फेऱ्यांद्वारे दररोज २१ हजार १३८ किलोमीटर्सचा प्रवास पार केला जातो. तर सफाळे आगाराच्या ४२७ फेऱ्यांद्वारे ७ हजार ६७६ किमी, वसई आगाराच्या ३५८ फेऱ्यांद्वारे २० हजार १४५ किमी, अर्नाळा आगाराच्या २९८ फेऱ्यांद्वारे २२ हजार ६५५.४ किमी, डहाणू आगाराच्या ४४५ फेऱ्यांद्वारे १६ हजार ०४०.६ किमी, जव्हार आगाराच्या ४५७ फेऱ्यांद्वारे १९ हजार ६३६.३ किमी, बोईसर आगाराच्या ५५५ फेऱ्यांद्वारे २२ हजार ०३८.२ किमी आणि नालासोपारा आगाराच्या १४६ फेऱ्यांद्वारे १३ हजार ८८७ किमीचा प्रवास पार पाडत एसटीचे चालक आणि वाहक एसटी विभागाला सुमारे ४५ लाखांचे उत्पन्न मिळवून देत आले आहेत. परंतु मार्च २०२० पासून कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या फटकाऱ्याने पालघर विभागाच्या सर्व सेवा कधी बंद तर कधी चालू अशा बेभरवशाच्या परिस्थितीत सुरू असल्याने या विभागाचे अर्थकारण रुतून पडले आहे.तोट्याच्या अर्थकारणात रुतून पडलेल्या एसटी विभागाला बाहेर काढण्यासाठी चालक-वाहकासह अधिकारी वर्ग कसोशीने प्रयत्न करीत असताना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडचणी निर्माण होत एसटी विभागाच्या उत्पन्नाचे स्त्रोत घटत चालले आहेत. १० एप्रिल आणि ११ एप्रिल रोजीच्या लॉकडाऊनच्या दोन दिवसात ७५ लाख ३३ हजार ६३६ रुपयांचा तोटा पालघर विभागाला सहन करावा लागला आहे. १० एप्रिल रोजी ८ विभागांतर्गत ४१० बसपैकी फक्त १४६ बसेस बाहेर पडून ७६७ फेऱ्यांद्वारे ४६ हजार ९५१ किमीचा प्रवास करून फक्त ११ लाख १९ हजार ०४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर ११ एप्रिल रोजी ८ विभागांतर्गत ४१० बसपैकी फक्त ३३ बसेस बाहेर पडून १० हजार ७५७ किमीचा प्रवास करून फक्त २ लाख १७ हजार ११८ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने या दोन दिवसात पालघर विभागाला ७५ लाख ३३ हजार ६३६ रुपयांचा तोटा सहन झाला आहे.
पालघर विभागाला ७५ लाख ३३ हजार ६३६ रुपयांचा झाला तोटा १० एप्रिल व ११ एप्रिल रोजीच्या लॉकडाऊनच्या दोन दिवसात ७५ लाख ३३ हजार ६३६ रुपयांचा तोटा पालघर विभागाला सहन करावा लागला आहे. १० एप्रिल रोजी ८ विभागांतर्गत ४१० बसपैकी फक्त १४६ बसेस बाहेर पडून फक्त ११ लाख १९ हजार ०४ रुपयांचे तर ११ एप्रिल रोजी फक्त ३३ बसेस बाहेर पडून फक्त २ लाख १७ हजार ११८ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु कोरोनामुळे प्रवासी बाहेर पडत नसल्याने एसटी विभागाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.- आशिष पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी, पालघर