- हुसेन मेमन
जव्हार: कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असतांना, राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन पुकारला आहे. जव्हार शहरात सोमवारी रात्री नगर परिषदेकडून बंदची दवंडी आणि मंगळवारी सकाळी अचानक सूचना न देता काही व्यपाऱ्यांवर प्रति 10 हजार दंड आकारण्यात आल्यामुळे व्यापारी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.
दवंडी मोठी व संभ्रमित असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व बंद असा उल्लेख न करता वेग वेगळी 12 टीप देत दवंडी दिल्यामुळे व्यापारी संभ्रमात होते, त्यांनी सकाळी आप आपली दुकाने उघडली, संबंधित प्रशासन विभागाने कोणाचेही न ऐकता प्रति व्यापारी 10 हजार दंड ठोठावला आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात नगर परिषद तथा महसूल विभागावर तीव्र नाराजी पसरली आहे.
आधीच लॉकडाऊन मध्ये सार्वांची कंबर मोडली असतांना प्रशासनाकडून जुलूम होत असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत, आम्हला कालची दवंडी नीट समजली नाही एकदा सांगा बंद करा जर आम्ही दुकान बंद केले नाही तर सांगा पण इतका दंड आकारू नका अशी प्रतिक्रिया पीडित व्यापाऱ्यांनी दिली.
अचानक केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे व्यापाऱ्यांची अधिकाऱ्यांसोबत तू तू मै मै झाली, त्यानंतर मुख्य सेवा वगळता कडक निर्बंध लादून जव्हारची संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली. दरम्यान बायपास रोडवरील व्यापाऱ्यांची हार्डवेअर सामानाच्या गोडाऊन आहेत, तेथे खाजगी काम सुरू होते, मात्र मुख्य बाजारपेठेची दुकाने बंद करण्या ऐवजी बायपास रोडवर ज्याठिकाणी किरकोळ गर्दी असते अशा गोडाऊनवर प्रथम कारवाई करण्याचा अजब कर्तब प्रशासनाने दाखवला आहे.
आम्हाला कालची दवंडी मोठी असल्यामुळे कळाली नाही, त्यामुळे आम्ही आमचे गोडाऊन उघडे ठेवले होते, मात्र जेव्हा आम्हाला कळलं त्यावेळेस आम्ही तातडीने गोडाऊन बंद करून गोडाऊन मध्ये दुरुस्ती करण्याचे काम सुरू ठेवले मात्र आम्ही बंद करूनही आमच्यावर दंडात्मक कारवाई केली गेली हे योग्य नाही. -मुद्दसर मुल्ला, गोडाऊन मालक, जव्हार