कल्याण : केडीएमसीतील २७ गावांतील विकासकामांबाबत कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांची बुधवारी भेट घेतली. २७ गावांतील ग्रामपंचायतींपासून कार्यरत असणारे आणि आता महापालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या ५९९ चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना सरकार निर्णयानुसार किमान वेतन दिले जाईल, असे आश्वासन वेलरासू यांनी या वेळी दिले.किमान वेतन लागू करण्यासाठी सर्व कर्मचारी १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार होते. यापार्श्वभूमीवर भोईर यांनी या कर्मचाºयांबाबत कोणता निर्णय घेतला आहे, अशी विचारणा केली असता आयुक्तांनी चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांबाबत सर्वसमावेशक नियम लागू करून येत्या महासभेत मंजुरी घेऊन त्यांना किमान वेतन लागू करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत २७ गावांतील शिवसेना नगरसेवक उपस्थित होते. या गावांतील महत्त्वाचे रस्ते तयार करण्याबाबत प्रशासनाने सविस्तर प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक एमएमआरडीएकडे सादर करण्याच्या सूचनाही भोईर यांनी केल्या. तसेच एमएमआरडीएद्वारे गावांतील रस्ते तयार करण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबतही त्यांनी आयुक्तांना सांगितले.डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील अनेक रस्ते नादुरु स्त झाले असून रस्त्यांचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. औद्योगिक महामंडळाने महापालिकेला रस्ते हस्तांतरित करण्याचे पत्र पाठविले आहे. परंतु, महापालिका निधीअभावी रस्त्यांच्या नूतनीकरणाची कामे करू शकत नसल्याने औद्योगिक महामंडळाला पुन्हा पत्र पाठवून निवासी विभागातील रस्ते काँक्रिटचे केल्यानंतरच महापालिका रस्त्याचे हस्तांतरण करेल, असे आयुक्तांनी या वेळी सांगितले.दरम्यान, या बैठकीला शहरअभियंता प्रमोद कुलकर्णी, नगरसेवक मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, नगरसेविका प्रेमा म्हात्रे, रु पाली म्हात्रे, माजी जि. प सदस्य प्रकाश म्हात्रे, रवि म्हात्रे, युवा सेनेचे योगेश म्हात्रे, परिवहन सदस्य मनोज चौधरी उपस्थित होते.
२७ गावांतील कर्मचा-यांना किमान वेतन, ५९९ कर्मचा-यांना लाभ : सुभाष भोईर यांनी घेतली आयुक्तांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 2:55 AM