ठाणे - दिवाळी सणाची लगबग सुरू असतानाच शुक्र वारी महापालिका आयुक्तसंजीव जयस्वाल आणि महापौर मीनाक्षी शिंदे आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या कामगारांच्या सर्व न्याय मागण्या मान्य करण्यात आल्या. कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार फरकाची रक्कम देण्याचा, ६ व्या वेतन आयोगातील त्रुुटी दूर करण्याचा, आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा, वेतन त्रुटी दूर करण्याचा, ६ व्या वेतन आयोगानुसार विविध भत्ते लागू करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय यावेळी घेण्यात आले. तसेच परिवहन सेवेच्या ६१३ कर्मचाºयांना १ महिन्यात नियमित करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेवर तिजोरीवर १०० कोटींचा बोजा पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थायी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सातत्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे सातत्याने मागणी होत होती. तसेच महासभेत सुध्दा नगरसेवक अशोक वैती आणि नजीब मुल्ला यांनी याबाबत वारंवार पाठपुरावा सुरु ठेवला होता. दरम्यान शुक्र वारी झालेल्या संयुक्त बैठकीत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे कंत्राटी पद्धतीने काम करणारे २०६ कुशल आणि १५४६ अकुशल कामगार, आरोग्य विभागाकडील २३२ कर्मचारी त्याचप्रमाणे शिक्षण विभाग, उद्यान विभाग, पाणी पुरवठा विभाग, मलिन:सारण विभाग या ठिकाणी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी २०१५ ते ३१ आॉक्टोबर २०१६ या कालावधीतील किमान वेतन कायद्यानुसार मिळणारी फरकाची रक्कम पाच हप्त्यात देण्याचा निर्णय घेतला. यातील पहिला हप्ता डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागामध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्र म आणि महिला व बाल कल्याण आरोग्य कार्यक्र मातंर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सरळसेवा नियुक्तीप्रमाणे देय असलेल्या पगाराच्या ६० टक्के किंवा किमान वेतन कायद्यानुसार जे जास्त असेल ते वेतन देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पे मधील त्रुटी दूर करून त्यांना सुधारीत नियमानुसार वेतन निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगितले. याचा जवळपास ७ हजार कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. दरम्यान, निवृत्त न्यायमुर्ती मारूती गायकवाड यांच्या वेतन त्रुटी समितीच्या अहवालानुसार तांत्रिक पदांची वेतन श्रेणी राज्य शासनाच्या धर्तीवर सुधारित करणार, तसेच शासन निर्णयानुसार आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. तसेच अग्निशमन दलातील कर्मचाºयांना त्यांची जबाबदारी विचारात घेवून उच्च वेतनश्रेणीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.या महत्वाच्या निर्णयाबोरबरच कर्मचाऱ्यांना विशेष पुरक भत्ता, वैद्यकीय भत्ता, वाहतूक भत्ता, अपंग महिला कर्मचारी विशेष भत्ता, निर्सग भत्ता देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. ठाणे परिवहन सेवेतील ६१३ अस्थायी कर्मचाऱ्यांना एका महिन्यात नियमित करण्याचा महत्वाचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
ठाणे महापालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांना मिळणार किमान वेतनाच्या फरकाची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 7:49 PM
ठाणे महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची आज खऱ्या अर्थाने दिवाळी सुरु झाली आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या त्रुटी दूर केल्या जाणार आहेत. तसेच टिएमटीच्या ६१३ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या संयुक्त बैठकीत महापौर मीनाक्षी शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला.
ठळक मुद्दे७ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार लाभटिएमटीचे ६१३ कर्मचारी होणार कायम