कल्याण : आघाडी सरकारच्या काळात एखादे काम असल्यास आमचे मंत्री अधिकाऱ्याला कार्यालयात बोलावून घेत होते. विद्यमान सरकारमधील मंत्री मात्र स्वत:च अधिकाऱ्यांच्या घरी जातात. हा चुकीचा पायंडा पाडला जात असल्याचा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.
कल्याण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणारे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि घटक पक्षांचा मेळावा शनिवारी सायंकाळी आयोजित केला होता. या मेळाव्यास माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह आमदार जगन्नाथ शिंदे आणि मान्यवर उपस्थित होते. केवळ आघाडी सरकारने केलेल्या विकासकामांचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला.
महायुतीच्या जाहीरनाम्यात मुंब्रा रेल्वेस्थानकाचा विकास केल्याचा उल्लेख आहे. वास्तविक, हा विकास कोणी केला, हे सगळ्यांना माहीत आहे. नशीब, त्यांनी कळवा रेल्वेस्थानकाचाही विकास केल्याचा उल्लेख जाहीरनाम्यात केला नाही, असेही ते म्हणाले.आव्हाड यांच्या भाषणाचा धागा पकडून माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी माझ्या कारकिर्दीत अधिकारीवर्गाला धाक होता. माझा दरारा होता. यांचा दरारा कुठे गेला, असा सवाल पालकमंत्री शिंदे यांचे नाव न घेता केला.