ठाणे: एका अपक्ष आमदाराला भाजपच्या गोटात जाण्यासाठी राज्य गुप्त विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला या प्रयत्न करीत असल्याचा गौप्यस्फोट गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगमध्ये पोलिसांच्या बदल्या आणि बढत्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे सरकार अडचणीत आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, हा डाव आता भाजपवरच उलटणार असल्याची शक्यता डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटमुळे निर्माण झाली आहे.
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडताना अनेक महत्वाच्या मुद्यांवर लक्ष वेधले होते. आता त्यांनी, अपक्ष आमदारांना महाविकास आघाडीपासून दूर करण्याचा प्रयत्न रश्मी शुक्ला यांनी केला होता, असा गौप्यस्फोट केल्याने आरोप करणार्या भाजपचीच कोंडी होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
“शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखिल प्रयत्न केला होता. अजून पुरावे काय पाहिजेत, असे ट्वीट गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.